मी सुखांना ठोकरून आलो!

तरही गझल
वृत्त: ?
लगावली: गालगागा/गालगाल/गागा
****************************************************
आदरणीय गझलकार श्री.चंद्रशेखर राजपूत यांच्या आग्रहास्तव लिहिलेली, त्यांनी दिलेल्या ओळीवरील,
ही तरही गझल!
श्री. चंद्रशेखर राजपूत यांना ही तरही गझलेची सस्नेह भेट........!
त्यांनी दिलेली मतल्याची पहिली ओळ अशी......
मी सुखांना ठोकरून आलो’
****************************************************

मी सुखांना ठोकरून आलो!
स्वप्न माझे कातरून आलो!!

नाहलो गंधात मी सखीच्या!
वृक्ष झालो....मोहरून आलो!!

कूट कोडे जिंदगीच माझी!
पूर्ण डोके, वापरून आलो!!

घावला उंदीरही न साधा!
जन्म सारा, पोखरून आलो!!

ते टवाळांचेच गाव होते.....
मी तिथेही वावरून आलो!

खुद्द ती, येणार आज आहे.....
काळजाला अंथरून आलो!

मोठमोठे लोक पंगतीला.....
झूल मीही, पांघरून आलो!

तोतऱ्यांच्या मैफलीत थोडा;
काल मीही चाचरून आलो!

लोक होते दीडशाहणे ते!
मी कशाला चरचरून आलो?

मी तटाचा नूर पाहिला अन्;
    गलबताला नांगरून आलो!   

सोड भीती, राजरोस भेटू....
मी जगावर डाफरून आलो!

फक्त काडी देउनी न आलो!
नाव बुडती सावरून आलो!!

वर्दळीला कल्पना न याची....
मी कितीदा चेंगरून आलो!

खूप झाले लाड रोज त्यांचे!
आज थोडे डाफरून आलो!!

जन्म अस्ताव्यस्ततेत गेला.....
आज मी, तो आवरून आलो!

ती अनाहूतापरीच आली....
त्यामुळे मी गांगरून आलो!

काय, निवृत्ती समीप आली?
थांब थोडे....ओसरून आलो!

आसमंताला मिळो न कोलित....
मी जगाला घाबरून आलो!

फक्त व्याख्याने दिली न आम्ही!
त्याप्रमाणे आचरून आलो!!

ठाकता मृत्यू समोर माझ्या;
मी म्हणालो....पाखरून* आलो!
(*पाखरणे म्हणजे सिद्ध होणे/तयार होणे)

लागला वारा तुझा, चितेला....
अन् पहा,मी भरभरून** आलो!
(** भरभरणे म्हणजे जोरात पेटणे)

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१