हृदयात कोरलेले एकेक नाव आहे!

गझल
वृत्त: आनंदकंद
लगावली: गागाल/गालगागा/गागाल/गालगागा
****************************************

हृदयात कोरलेले एकेक नाव आहे!
अजुनी तसाच ताजा प्रत्येक घाव आहे!!

भाजून घेच पोळी! बघ, छान ताव आहे!
धू हात आज तूही, आताच वाव आहे!!

नावानिशीच इथला माणूस ओळखे मी;
कळते मला अरे हा माझाच गाव आहे!

डॉक्टर हवा कुणाला, इंजीनिअर कुणाला;
या दोन जावयांचा भलताच भाव आहे!

झालो न भाट केव्हा, केली कधी न हांजी!
करतो पुढे पुढे जो, त्याचेच नाव आहे!!

खेळात जीवनाच्या ही एकमेव आशा.....
हातात माझियाही येणार डाव आहे!

जनताजनार्दनाने हा फैसला करावा....
गझलेत भाव आहे की, फक्त आव आहे?

अध्यात्म काय त्यांना साठीतही कळेना;
पैसा असो प्रसिद्धी, सगळीच हाव आहे!

आयुष्य खर्च झाले, गझलेस आकळाया;
मज लागलाच कोठे अद्याप ठाव आहे?

गझलेवरील त्यांचे प्रतिसाद हे म्हणू की,
अतृप्त कावळ्यांची ही कावकाव आहे?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१