पोटतिडकीला नको समजूस त्रागा!

गझल
वृत्त:मंजुघोषा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा
****************************************************

पोटतिडकीला नको समजूस त्रागा!
मी भटांच्या तळमळीचा शेष धागा!!

कोणतीही बंधने फुलण्यावरी ना.....
या अशा उरल्यात कोठे आज बागा?

शेर गोटीबंद अन् सुंदर किती तो.....
फेरफाराला जिथे कुठली न जागा!

जन्म गेला हा उभ्याने सर्व माझा....
ना मिळाली वळचणीपुरतीच जागा!

कापतो जो तो मला सोयीप्रमाणे.....
वाटतो मी काय गझलेचाच तागा?

कैक आसाराम झाले आज उघडे!
काय झोपेतून झाला देश जागा?

मी न केले राजकारण वा न कावे.....
पात्रता असते तशी मिळतेच जागा!

आज जो तो जाहला स्वायत्त आहे!
चालते सारे....कसेही आज वागा!!

संत कुठला, वासनेचा तो पुजारी!
चेहरा ज्याचा खरा जाहीर टांगा!!

नाव बापू जाहले बदनाम आहे!
आजच्या बापूंस ना उरल्यात लाजा!!

दूर नाही गाव गझलेचे कवींनो.....
जोखडे फेका...चला, कामास लागा!

हक्क जोपासा तसे कर्तव्य पाळा!
स्पष्ट कारण, हक्क डावलल्यास, मागा!!

जमिन जर खडकाळ अन् रेताड आहे;
दोष का देता उगा तुम्ही परागा?

यायचा गझलेत तो आत्मा कसा रे?
घोकती ते गालगागा....गालगागा!

गायकी पेशीत, अंगांगात ज्याच्या.....
त्यास सांगावे न लागे...गा, अरे, गा!

स्वार्थ साधायास ज्याचा जन्म गेला.....
त्यास तू पुसतोस किंमत काय त्यागा?

तो न तकलादू....कुणीही कीड लावा....
वाळवी लागायची सहजी न सागा!
   
जीव गेल्यावर किती उरणार तुम्ही?
जीवनाला फक्त पुण्यानेच भागा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१