तू...मेघ पावसाचा! मी....चातकाप्रमाणे!

एक केली चूक अन् आयुष्य इतके फाटले......
की, पुन्हा हातून माझ्या ते न गेले टाचले!
...........प्रा.सतीश देवपूरकर
...................................................................
गझल
वृत्त: आनंदकंद
लगावली: गागालगा/लगागा/गागालगा/लगागा
*****************************************************

तू...मेघ पावसाचा! मी....चातकाप्रमाणे!
क्षण एक एक जगलो, एका युगाप्रमाणे!!

जगलो प्रसन्नतेने ठरवून मी परंतू;
कुठलीच गोष्ट नाही घडली मनाप्रमाणे!

मी चाळिशीत होतो; साठीत वाटलो मी!
मज पाहिले न कोणी माझ्या वयाप्रमाणे!!

वारा वहात होता.....तिकडेच जात होतो!
केला प्रवास सारा, मी गलबताप्रमाणे!!

आई, वडील, मुलगे....बोलायचीच नाती!
माझ्या घरामधेही, मी पाहुण्याप्रमाणे!!

सांभाळण्यात मर्जी हा जन्म खर्च झाला.....
होती हयात माझी, जगलो जगाप्रमाणे!

मुलगीच फक्त नाही....ही खाप काळजाची!
सांभाळ यापुढे तू तिजला फुलाप्रमाणे!!

होतो हिरा परंतू, खडतर नशीब होते!
त्यांनी मला निवडले एका खड्याप्रमाणे!!

चाळा जगास होता पाषाण मारण्याचा;
मी मात्र स्तब्ध होतो, एका तळ्याप्रमाणे!

त्यांनी मला बसवले खुर्चीत खूप मोठ्या!
ते वापरीत होते मजला टिळ्याप्रमाणे!!

  
    ------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१