तुझ्या स्मृतींची सळसळ होते!

गझल
वृत्त: मात्रा वृत्त
मात्रा:१६(८+८)
प्रेरणा: आदरणीय गझलकार श्री.राज पठाण यांची
***************************************************

तुझ्या स्मृतींची सळसळ होते!
एकांताची वर्दळ होते!!

तुझ्या फक्त आभासानेही.....
झुळूक सुद्धा दरवळ होते!

कोण मारतो खडा न माहित!
स्तब्ध मनाची खळखळ होते!!

तुला पाहता क्षणात माझी....
गायब सारी मरगळ होते!

असा सावळा काळा मी पण.....
तुला आयते काजळ होते!

पदर तुझा वाऱ्याने ढळतो....
हृदयी माझ्या सळसळ होते!

तुझी वाट नेटाने बघतो!
पण, डोळ्यांची जळजळ होते!!

नजर तुझी लाघवी बघोनी;
काळजात या खळबळ होते!

तुझ्या बटा या उनाड उडता....
झुळूक सुद्धा अवखळ होते!

लाट किनारी आदळते अन्....
किती जिवांची वळवळ होते!

असे काय गझलेत माझिया?
वाचता क्षणी मळमळ होते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१