नजर नजरेशी अचानक आज बोलू लागली!

गझल
वृत्त: देवप्रिया
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगा
प्रेरणा: आदरणीय गझलकार श्री.राज पठाण यांची
****************************************************

नजर नजरेशी अचानक आज बोलू लागली!
अंतरीचे गूज जगजाहीर खोलू लागली!!

मी भरारू लागलो गगनी पतंगासारखा.....
मज तुझी  रेशीमप्रीती आज तोलू लागली!

तू दिलेला सूर आहे, तू दिलेला तालही....
जिंदगी  झोकात माझी आज डोलू लागली!

शब्द ओलांडून माझी शायरी गेली पुढे....
अन् समीक्षक मंडळी शब्दांस सोलू लागली!

वजनकाटे, मोजपट्ट्या घेउनी धेंडे उभी....
आणि माझ्या शायरीचे माप तोलू लागली!

मोडली नव्हती तिने कित्येक स्वप्नांची घडी!
रेशमाची बासने ती आज खोलू लागली!!

नाव थोडेफार माझे लागले होऊ तसे....
माणसे मजला शिताफीनेच टोलू लागली!

जिंदगी माझी विटीदांडूप्रमाणे वाटते!
ही पहा दुनिया मला दररोज कोलू लागली!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१