मी तुझ्यावर प्रेम केले!

गझल
वृत्त: मनोरमा
लगावली: गालगागा/गालगागा
******************************************************

मी तुझ्यावर प्रेम केले!
मृगजळावर प्रेम केले!!

तू दिलेल्या आसवांच्या....
मौक्तिकावर प्रेम केले!

चाहुलीचा मी भुकेला!
पैंजणावर प्रेम केले!!

पौर्णिमेला ज्ञात नाही....
मी तिच्यावर प्रेम केले!

मी चकोराचीच तृष्णा!
चांदण्यावर प्रेम केले!!

मौन बोलू लागता, मी....
बोलण्यावर प्रेम केले!

जीव घेणारी खळी तू.....
मी स्मितावर प्रेम केले!

जिंदगी झाली सुरीली!
मी सुरावर प्रेम केले!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१