काय मी बनणार आहे शेवटी?

काय मी बनणार आहे शेवटी?
नोकरी बघणार आहे शेवटी
चालु द्या, तुमच्या नृपांनो वल्गना!
राम ती वरणार आहे शेवटी! 
शेवटी उरतात वेडे मोजके
त्यात मी रमणार आहे शेवटी 
बांध रे बिनधास्त मजले आणखी..
वैधता मिळणार आहे शेवटी!
शेवटी सुरवात होते नेहमी
हेच का घडणार आहे शेवटी?
थांब ना, थोडी जरा प्रतिमेमधे
रंगही भरणार आहे शेवटी
मी कुठे असणार आहे, प्रियतमे?
तू जिथे असणार आहे शेवटी 
कोळसा आहे, तरी पाहुन घ्या..
मी हिरा बनणार आहे शेवटी 
शेवटी जगशील तू माझ्याविना
पण कसा जगणार आहे शेवटी?
मी अणि त्या तेथल्या घरचा दिवा
एकटे जळणार आहे शेवटी!
वेड हे परिपूर्णतेचे केव्हढे..!
व्यंगही हसणार आहे शेवटी!