हवा भोवताली गुलाबी गुलाबी!

गझल
वृत्त: भुजंगप्रयात
लगावली: लगागा/लगागा/लगागा/लगागा
****************************************************

हवा भोवताली गुलाबी गुलाबी!
तुझी याद आली गुलाबी गुलाबी!!

अचानक मला लागली काय उचकी....
तुला याद आली गुलाबी गुलाबी!

तुझ्या पैंजणांचीच चाहूल आली....
तिन्हीसांज झाली गुलाबी गुलाबी!

तुझा लालिमा लाटतो आज जो तो!
नभी तीच लाली गुलाबी गुलाबी!!

गुलाबा! न लाली, गुलाबी तुझी ही!
प्रियेचीच लाली...गुलाबी गुलाबी!!

    तिचा स्पर्श झाला पुसटसा, निसटता....   
गुलाबा मिळाली.....गुलाबी गुलाबी!

तिचा रंगउत्सव गुलाबी असा की;
कळी तीच ल्याली गुलाबी गुलाबी!

तिच्या चेहऱ्याच्या छटा पाहिल्या अन्.....
गुलाबा कळाली.... गुलाबी गुलाबी!

तिने रंगउधळण केली सकाळी.....
उषा त्यात झाली गुलाबी गुलाबी!

गुलाबीपणाच्या प्रपातापरी ती!
फुले चिंब न्हाली गुलाबी गुलाबी!!

पहा फक्त माझी स्मृती काय करते...
दिसे मीच गाली गुलाबी गुलाबी!

 तुझी साद आली गुलाबी गुलाबी!
पहा रात्र  झाली गुलाबी गुलाबी!!

कपाळी उसळत्या बटा जीवघेण्या...
खळी गोड गाली गुलाबी गुलाबी!

तुझी ताटव्यांतून येजा जहाली....
फुले चक्क प्याली गुलाबी गुलाबी!

तुझ्या लोचनांचा गुलाबांस हेवा!
दिठीच्या पखाली गुलाबी गुलाबी!!

 उभी जिंदगानी गुलाबीच झाली!
तुझ्या ती हवाली गुलाबी गुलाबी!!

तुझ्या कुंतली भाग्य त्यांचे उजळले!
फुले भाग्यशाली गुलबी गुलाबी!!

तुझ्या वेदनाही हव्याशा हव्याशा!
सजा ही मिळाली गुलाबी गुलाबी!!

नजरही हटेना अशा भावमुद्रा!
तुझ्या हालचाली गुलाबी गुलाबी!!

तुला पाहुनी शीळ वाराच घाली.....
तुला साद घाली गुलाबी गुलाबी!

कडाका दुराव्यातला सोसण्या मी.....
लपेटेन शाली गुलाबी गुलाबी!

दुरावा...कडाका! स्मृतींचा उबारा!
लपेटेन शाली गुलाबी गुलाबी!!

अबोला तुझा एक फिर्याद होती....
निकाली निघाली गुलाबी गुलाबी!

दुरावा तुझा दाट काळोख आहे!
स्मृतींच्या मशाली गुलाबी गुलाबी!!

अता जाहलो ज्येष्ठ मी नागरिक अन्....
कशी ही अकाली गुलाबी गुलाबी?

मनोमीलनाचीच ही खूण आहे!
मनाच्या महाली गुलाबी गुलाबी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर             
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१