एरव्ही जगासवे, मी भलेच बोलतो!

तरही गझल
वृत्त: ?
लगावली: गालगाल/गालगा/गालगाल/गालगा
मतल्यातील पहिली ओळ आदरणीय गझलकार सदानंद डबीर यांची
*************************************************************

एरव्ही जगासवे, मी भलेच बोलतो!
मात्र जे मनामधे, ते तसेच बोलतो!!

थेट लोचनांमधे, मी बघून बोलतो!
का कुणास घाबरू? मी खरेच बोलतो!!

पिंड हा, स्वभाव हा, तो असेच वागतो.....
बोल तू किती भले, तो बुरेच बोलतो!

माणसासवे अशा, काय बोलणार मी?
चालढाल वाकडी.....वाकडेच बोलतो!

ना उगाच लाभले, मित्र एवढे मला!
हातचे न राखतो....मोकळेच बोलतो!!

या मनास शांतता ना फुकाच लाभते!
पारदर्श राहतो...चांगलेच बोलतो!!

लेखणीस धार या लाभली तुझ्यामुळे!
आजकाल बोलही, मी तुझेच बोलतो!!

शब्द, शब्द हा तुझा! शायरी तुझीच ही!
तोकडा असून मी, नेमकेच बोलतो!!

मान्य की, भिडस्त मी, बोलण्यामधे जरी....
आजकाल बोलही, मी खडेच बोलतो!

प्यायलो न प्यायलो, भेद ना पडे मला!
नेहमीच रे असा, मी खरेच बोलतो!!

-------प्रा.सतीश देवपूरकर             
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१