आरशाने पाहिला तो भास होता!

गझल
वृत्त: मंजुघोषा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा
***************************************************

आरशाने पाहिला तो भास होता!
मी नव्हे, माझाच तो व्यत्यास होता!!

तोकडी पडली जगाची मोजपट्टी.....
मोजण्याजोगा न माझा व्यास होता!

मी मला उधळीत सुटलो दशदिशांना......
एक मुलखावेगळा हव्यास होता!

ते कटाक्षांचेच साखळदंड होते......
तो गुलाबी एक कारावास होता!

व्हयची पाऊस, केव्हा ऊन्हही तू....
रोज आयुष्यात श्रावणमास होता!

सोसले वैशाख विरहातीलही मी....
अंतरी माझ्या तुझा मधुमास होता!

लाभला शेजार मजलाही सुखांचा!
केवढा दुर्मीळ तो सहवास होता!!

सोयऱ्यांना ना कधी आला उमाळा!
पण, जिव्हाळा वाटला परक्यास होता!!

पांगळा होतो, परी हतबल न होतो!
पांगळ्या पायांवरी विश्वास होता!!

आरुषी गेली....दिवस तो आज स्मरतो!
या घशाखाली न गेला घास होता!

मात मी खावो किती वेळा परंतू.....
शेवटी माझा विजय हमखास होता!

आमचा पेशा मुळी होता असा की,
रोज तासंतासचा अभ्यास होता!

मी मलाही वाचवू शकलो न तेव्हा....
समजण्याआधीच झाला –हास होता!

दुःख दुनियेचे सतावे लेखणीला....
सांगता आला न माझा त्रास होता!

त्यामुळे जगणे तरी मज शक्य झाले!
तू न संगे पण, तुझा आभास होता!!

लोकनिंदेने मला केले शहाणे!
लागला समजायला उपहास होता!!

शेवटी शिकलोच डोळेझाक करण्या....
मार्ग हा मी काढलेला खास होता!

ही महागाई न जेवू द्यायची मज.....
रोज एकावेळचा उपवास होता!

राजकारण पिंड नव्हता....प्रांत नव्हता!
हा विजय माझा विनासायास होता!!

माणसे इतकी, कुणाला मी पुसावे?
नेमका पत्ता तुझा कोणास होता?

वाटलो मी  कोण? अन् मी कोण होतो?
जन्म माझा हा विरोधाभास होता!

ना उगा झरल्या अशा कलदार गझला!
गझल माझा श्वास होता, ध्यास होता!

------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१