म्हणेल ती, वागतो तसा मी!

तरही गझल
वृत्त: जलौघवेगा
लगावली: लगालगागा/लगालगागा
मतल्यातली पहिली ओळ राज पठाणांची
***************************************************

म्हणेल ती, वागतो तसा मी!
तिला न ठाऊक की, कसा मी?

करेन मी खेळ, वेळ जैशी....
बनेन कासव, कधी ससा मी!

तिचाच टेकू....म्हणून आता...
उभा रहातो कसा बसा मी!

धुळीमधे पूर्ण माखलेला....
भविष्यकाळातला ठसा मी!

कुणी नसे भोवतीच तेव्हा....
रडून घेतो ढसा ढसा मी!

जगास मी भरभरून देतो!
जरी दिसाया रिता पसा मी!!

मनातले वाचतो...पहातो!
असा निराळाच आरसा मी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर             
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१