वागाया अवखळ होता, तोंडाचा फटकळ होता!

गझल
वृत्त: समजाती-पद्मावर्तनी-लवंगलता-मात्रावृत्त
मात्रा: ८+८+८+४=२८मात्रा
*************************************************

वागाया अवखळ होता, तोंडाचा फटकळ होता!
वस्तीत तोच एकुलता हृदयाचा निर्मळ होता!!

यश निघून गेले, त्याच्या, देवून तुरी हातावर......
दुर्दैव आडवे आले, पण, प्रयत्न प्रांजळ होता!

तो ओबडधोबड होता! तो कुटिल मनाचा होता!
पण दिसावयाला वरुनी टोकाचा सोज्वळ होता!!

कोणाला नकार देणे, डिक्श्नरीत नव्हते त्याच्या;
तो भिडस्त नव्हता नुसता, माणूसच प्रेमळ होता!

अंदाज कुणाला त्याचा बांधताच आला नाही!
पाचोळा वाटत होता, वास्तवात वादळ होता!

पायाच खोदण्यामध्ये वय तारुण्याचे गेले!
बहुमजली आयुष्याच्या पायथ्यात कातळ होता!!

जन्मास दिव्याच्या आला, अन् काजळला इतका की,
दुनियेच्या लेखी अंती तो केवळ काजळ होता!

सोडला प्राणही त्याने, आसवे न सरली त्याची!
गालावर अजून त्याच्या अश्रूंचा ओघळ होता!!

जे म्हणावयाचे होते, त्यांनाही पटले नव्हते!
आवेशपूर्ण केलेला युक्तिवाद ओंगळ होता!!

तो जगावेगळा होता....तो एकलकोंडा होता!
एकाकीपणात त्याच्या, तो स्वतःच वर्दळ होता!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१