दिसत नाही तरी आहे तुझ्यामाझ्यामधे धागा!

गझल
वृत्त: वियद्गंगा
लगावली: लगागागा/ लगागागा/ लगागागा/ लगागागा
**************************************************

दिसत नाही तरी आहे तुझ्यामाझ्यामधे धागा!
तुझ्या हृदयामधे मी अन् तुझी हृदयात या जागा!!

तुझ्या श्वासात मी आहे, तुझा नि:श्वास सुद्धा मी!
कितीही राग धर तू पण, नको सोडूस अनुरागा!!

न नुसता घाम निढळाचा इथे मी ढाळला होता....
दिले मी रक्तही माझे, फुलायाला इथे बागा!

शिकवताना मुलांना मी कधी केला न कंटाळा!
तिडिक ना पाहिली कोणी, पहाती फक्त ते त्रागा!!

उभे आयुष्य हे माझे जणू आलाप झालेले!
न मी उरलो परी दुनिया अलापे माझिया रागा!!

नका दुबळे कुणी समजू असे देशास या माझ्या....
कुणीही बंदुका झाडा, कुणी तोफा कधी डागा!

किती हा सोस चैनीचा, भिकेची लाजही नाही!
कुठेही तोंड वेंगाडा....भिका कोणाकडे मागा!!

प्रयत्नांनीच यश मिळते! न अवघड बाब कुठलीही!
पहा स्वप्ने परी आधी, चला कामास रे लागा!!

न जमली पोखरायाला व्यथांना जिंदगी माझी!
न लागे वाळवी सहजी कधीही कोणत्या सागा!!

कधी ना चारचौघांच्या प्रमाणे घर दिसे माझे!
खुराड्यासारखे वाटे, कधी घर वाटते पागा!!

जगाने कापले मजला असे सोयीप्रमाणे की,
सुखाच्या कापडाचा मी जगाला वाटलो तागा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१