गगनात वीज लकलकते, अन् तुझी आठवण येते!

गझल
वृत्त: समजाती-पद्मावर्तनी-लवंगलता-मात्रावृत्त
मात्रा: ८+८+८+४=२८
*******************************************

गगनात वीज लकलकते, अन् तुझी आठवण येते!
सर वळवाची कोसळते, अन् तुझी आठवण येते!!

मृद्गंध नव्हे धरणीचा, हा गंध तुझ्या पदराचा!
झुळकीने मन कळवळते, अन् तुझी आठवण येते!!

लवलवणारी ही फांदी, की, रुळणारी ही वेणी?
एखादे फूल निखळते, अन् तुझी आठवण येते!

बिलगली वेल भिजलेली, की, तूच उभी ओलेती?
गात्रात शिरशिरी भरते, अन् तुझी आठवण येते!!

सर अवचित जावी पडुनी, तारुण्य तसे ओसरते!
हुरहूर तेवढी उरते, अन् तुझी आठवण येते!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१