हेलकाव्यानेच एका चाललो झोकात मी....

गझल
वृत्त: देवप्रिया
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगा
**************************************************

हेलकाव्यानेच एका चाललो झोकात मी....
तो तुझा होता कवडसा...ज्यामुळे झोतात मी!

ठिकठिकाणी मीच होतो दोन ओळींच्यामधे....
वाटले लोकांस की, गझलेतल्या मक्त्यात मी!

काय इतका वाटलो व्यामिश्र मी दुनियेस या?
मांडला गेलो अखेरी, बघ कसा तक्त्यात मी!

त्यामुळे हा जीवघेणा वाटतो मुरका तुझा....
लाजते आहेस तू पण, हर तुझ्या नखऱ्यात मी!

एक मी बिंदू तुझ्या जो वणवणे परिघावरी!
तू कुठेही जा, तुझ्या भवती प्रिये दिनरात मी!!

गझल ती माझीच आहे... समजते मक्त्याविना!
लाख मी टाळो तरीही, उतरतो मतल्यात मी!!

-------प्रा. सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१