वाट हरवते फुलांत तेव्हा, काट्यांनाही वाट पुसावी!

मुक्तक
वाट कोणी देत नसतो, वाट व्हावे लागते!
गाठण्यासाठी किनारा लाट व्हावे लागते!
चोरवाटा, आडवाटा लोपती वाटेमधे,
गाठ शिखरांशी पडाया घाट व्हावे लागते!!
..........प्रा.सतीश देवपूरकर
गझल
वृत्त: समजाती-पद्मावर्तनी-वनहरिणी-मात्रावृत्त
मात्रा: ८+८+८+८=३२मात्रा
*************************************

वाट हरवते फुलांत तेव्हा, काट्यांनाही वाट पुसावी!
वाटसरूने वाटेवरच्या वळणांनाही वाट पुसावी!!

हृदयामध्ये गाणे असले की, जगणेही गाणे होते;
जगणे खडतर होते तेव्हा, गाण्यांनाही वाट पुसावी!

काळजातल्या अमूर्त ओळी अडखळती ओठांवर येता;
अशाच वेळी, गुणगुणताना, शब्दांनाही वाट पुसावी!

चार पावलांवर घर अन् मी हुडकायाला वणवण केली......
थोर मिळाले थोर, अन्यथा पोरांनाही वाट पुसावी!

उशी करावी धरणीची अन् नभ घ्यावे पांघरण्यासाठी;
दिशाभूल करतात दिशा तर....वाऱ्यांनाही वाट पुसावी!

चांदण्यातल्या भेटीगाठी, रुसवे फुगवे, नभही साक्षी;
पुन्हा जायला त्या वळणावर, ताऱ्यांनाही वाट पुसावी!

पैलतीर जाणवतो जीवा, दिशा नेमकी उमजत नाही!
वाटचाल करताना वेड्या, लाटांनाही वाट पुसावी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१