दारू, सत्ता, पैसा, नारी; ध्येय वेगवेगळे

दारू, सत्ता, पैसा, नारी; ध्येय वेगवेगळे
नशा तीच, पण प्रत्येकाचे पेय वेगवेगळे

एक जरी हा प्रवास आणिक अंत एक सर्वांचा
वेगवेगळी ओझी अन्‌ पाथेय वेगवेगळे

स्तन्याचे, वात्सल्याचे, प्रीतीचे, कर्तव्याचे
आयुष्याच्या हर टप्प्याचे देय वेगवेगळे

मोळी बांधा, साकल्याने अर्थ लावता येतो
शब्द एरवी कवितेचे अज्ञेय वेगवेगळे

अस्थैर्याची, चंचलतेची चर्चा जेव्हा होते
'भृंग' मूर्त उपमान एक, उपमेय वेगवेगळे