पाऊल तुझे पडले अन् धरणीचे सोने झाले!

गझल
वृत्त: समजाती-पद्मावर्तनी-लवंगलता-मात्रावृत्त
मात्रा: ८+८+८+४=२८मात्रा
********************************************

पाऊल तुझे पडले अन् धरणीचे सोने झाले!
माती न राहिली माती, मातीचे सोने झाले!!

तू हात दिला अन् फुलली, बहरली जिंदगी माझी!
आधार मिळाल्यावरती, वेलीचे सोने झाले!!

तू दिलीस जेव्हा जेव्हा लेखणीस माझ्या वाणी;
लिहिलेल्या एका एका ओळीचे सोने झाले!

टाकलीस तू माझ्याही पदरात कृपेची भिक्षा;
फाटक्याच आयुष्याच्या झोळीचे सोने झाले!

हलकेच दार नशिबाने वाजवले आयुष्याचे!
अन् मीही जागा होतो, संधीचे सोने झाले!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१