ऐकुनिया त्यांच्या वचना --

      सासवड येथे आज मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे. यापूर्वी जेव्हां औरंगाबादला साहित्य संमेलन भरले होते तेव्हां तत्कालीन मुख्यमंत्री त्या संमेलनास उपस्थित होते व त्यावेळी त्यांनी चांगल्या लोकांनी राजकारणात आले पाहिजे असे आवाहन केले होते (म्हणजे सध्या राजकारणात चांगले लोक नाहीत? ) त्यास अनुलक्षून ही कविता लिहिली होती.

खडकीच्या माळावरती संमेलन साहित्याचे
भरलेले पाहुन गंपू जाई अति औत्सुक्याने
साहित्य सोनिया खाणी वाटले तयाला तेथे
पुस्तक प्रदर्शन यात्रा कविसंमेलनही होते.
परिसंवादाची तैसी ऐकण्यास  संधी नामी
जमताती येथे सगळे साहित्यिक शब्दस्वामी
येवढेच नव्हते काही आणखीहि काही होते
शिवप्रेमी संस्कृतिरक्षक पाहऱ्यास बसले होते
श्रुति धन्य होति गंपूच्या अन नेत्रहि दिपुनी गेले
पाहूनि कितितरी थोर मंचावर बसले होते
जरि सेवक साहित्याचे  फारसे दिसत ते नव्हते
तरि तुरळक का होईना अस्तित्व जाणवत होते
दिसतात उठुन त्यामध्ये मंत्रीही आजी माजी
दिसती सहभागी होता ते परिसंवादामाजी
त्या मंत्र्यांमध्ये दिसती शोभुनी मुख्यमंत्रीजी
ते हंसतमुखे बघतात बाकीचे करती जीजी
आवाहन त्यांनी केले सुजनांस "लोकहो तुम्ही
घ्या  राजकारणी भाग त्यामध्ये संधी नामी
जनतेची करणे सेवा जर  असेल इच्छा तुमची
या राजकारणामध्ये होईल पूर्तता साची
येथेच असे हो संधी  करण्यास्तव कामे नाना "
हो बहु प्रभावित गंपू ऐकुनिया त्यांच्या वचना
मी त्यास इशारा केला हे नुसते ऐकुन घेणे
मनि काही त्याचा परि ना लवलेश राहुनी देणे
उमजे न परी ते त्याला तो पुरता भारुनि गेला
हासुनी उलट वेड्यात तो काढु लागला मजला
मज म्हणे बोलती थोर कृति तैसी करणे योग्य
मम कानावरती बोल पडले हे माझे भाग्य
भारावुन गेला म्हणुनी त्यापुढे मानली हार
पण राजकारणी जाणे हे भूत तयावर स्चार
तो तडक उठोनी जाई कार्यालयात पक्षाच्या
आस्थेने अध्यक्षांनी पुसले मनोगता त्याच्या
किति द्रव्य असे तुजजवळी आंकडा सांग रे त्याचा
किंवा अससी का तारा तू चंदेरी दुनियेचा
 जर पुत्र अससि मंत्र्याचा वा साखरसम्राटाचा
वा शिक्षण सम्राटांच्या असशील श्वानही घरचा
तर निवडणुकीच्या आहे रिंगणात तुजला मान
गंपू मग होय उदास हे खडे बोल ऐकून
परि धीर करूनी बोले "जे सांगितले थोरांनी
त्यांच्याही वरचे थोर त्यांचेहि ऐकले कानी
की राजकारणी संधी तरुणा सुजनांनाही
त्यामुळेच इथवर आलो मी तरुण  सभ्य माणुसही "
ऐकून तयाचा हेतु अध्यक्ष मनोमन हसले
पाठीवर ठेवुन हात मृदु भाषेमध्ये वदले
" मग असे बोल की बाळा लागती पक्षकार्यास
 " तुजसम उत्साही लोक पाहिजेत रे आम्हास
तुज अवश्य आहे वाव लावण्यास आपुली काया
मेंबर होउन पक्षाच्या तू लाग लगोलग कार्या
जा लाव फलक पक्षाचे उद्घाटन मेळाव्यांचे
किंवा नेत्यांच्या आपल्या स्वागत वा वाढदिनांचे "
ऐकून हारकुन गेला गंपू मग तेथुन उठला
उपदेशा अध्यक्षांच्या पालन त्वरित करण्याला
बहु दिन पत्ता मज नव्हता गंपूच्या वास्तव्याचा
शासकीय पाहुणचारी पुसता घरि कळले त्याच्या
कुठल्यातरि मोर्च्यामध्ये सामिल तो झाला म्हणुनी
पकडुनी तयाला नेले सांगते माय ती रडुनी
नंतर काही दिवसांनी तो अकस्मात मज दिसला
पण नूर तयाचा नव्हता पूर्वीचा आता उरला
भेटला वदे मज गंपू  " लावला खडा या काना
यापुढे न काही करणे ऐकुनिया त्यांच्या वचना "