जरासा हर्ष झाला

मोरपंखी आठवांचा स्पर्श झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

ब्रह्मकमळासम तुझे येणे क्षणाचे
दरवळाने धुंदते अंगण मनाचे
साजरा हा सोहळा प्रतिवर्ष झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

ते तुझे असणे नि नसणे खंत नव्हती
आठवांची तर कधीही भ्रांत नव्हती
तुजमुळे या जीवनी जल्लोष झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

शांत झालो आठवांच्या वादळाने
भागते तृष्णा कधी का मृगजळाने?
स्वप्न, वास्तव जीवनी संघर्ष झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

बरळतो माझ्या मनाला वाटते ते
बोलशी तू तोलुनी जे शोभते ते
मुखवटा फसवा तुझा, आदर्श झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

समिकरण मी मांडता नाना प्रकारे
बाब आली एक ध्यानी जीवना रे!
तिजविना मी शुन्य हा निष्कर्ष झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com