लोचने पाणावण्याची शक्यता!

गझल क्रमांक १०
वृत्त: मेनका
लगावली: गालगागा/गालगागा/गालगा
****************************************************

लोचने पाणावण्याची शक्यता!
जाणतो मी, आज आहे सांगता!!

कैक झाली पूर्ण, काही राहिली.....
आज स्वप्नांचीच त्याही पूर्तता!

दाटुनी आल्या पुन्हा साऱ्या स्मृती....
काळ गेलेला समोरी ठाकता!

जे ठरवले, तेच केले जीवनी!
आज कळते काय असते धन्यता!!

    काढुनी काळीज मी माझे दिले.....
चाखतो मी आगळी संतुष्टता!

आज बाकी सर्व  चुकती जाहली.....
आज नाही राहिली उद्निग्नता!

तूच पाषाणास या केले हिरा.....
अन्यथा माझी कशाची योग्यता!

तू दिला मज हात, हे विसरू कसा?
जाणतो मी काय माझी पात्रता!

आज आली प्रार्थना माझी फळा!
पोचली पर्यंत तुझिया आर्तता!!

वागलो मर्जीप्रमाणे मी तुझ्या....
हीच बुद्धी दे पुढेही तू अता!

वाट काट्यांची, तरीही चाललो....
जाणले मी योग्य रस्ता  कोणता!

जाळली आजन्म जेव्हा जिंदगी.....
आज थोडीफार लाभे मान्यता!

कोण जाणे जाहला बभ्रा कसा?
मी कुठे केली कशाची वाच्यता?

जन्मजन्माचीच पुण्याई खरी.....
त्यामुळे हा जन्म आला काटता!

रोजचे आयुष्य पण, वाटे नवे!
रोज येते प्रत्यया अप्रूपता!!

लोचने दिपतात माझी पाहुनी.....
काय ही आहे तुझी शालीनता!

का उगारू हात जे जोडायचे?
जोडल्याने हात येते नम्रता!

मी जसा शिकलो, सवरलो, तसतसा.....
बाणली अंगामधे ही लीनता!

श्वास कर्जाऊच सारे जाणतो.....
कर्जदाराला कशाची आढ्यता?

सोसले असते जिव्हारी वारही.....
पण, अबोला येत नाही सोसता!

काय असते सौख्य हे मी जाणतो....
जे दिलेला शब्द मिळते पाळता!

पाय हे अद्यापही रेंगाळती......
गाव स्मरणांचे न येते टाळता!

भाग्यवंतांनाच मिळते साथ ही.....
मी तुझ्या प्रेमात पडलो पाहता!

तू नको पाडूस पाणी बोलुनी.....
काय कामची अरे वाचाळता?

त्यामुळे ना खंत मरणाची मला!
प्राण गेला जिंदगीशी झुंजता!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१