पावलांना स्पर्श मातीचा असू दे

पावलांना स्पर्श मातीचा असू दे
चालण्याचा मार्ग शांतीचा असू दे

प्राप्त गोष्टी दान दुसऱ्यां देत जाऊ
छंद अपुला रोज फिरतीचा असू दे

उंच आकाशात घेताना भरारी
पाखरांना वेध परतीचा असू दे

माणसांना जागवाया चाललो मी
अंतरीचा भाव ज्योतीचा असू दे

आजच्या परिवर्तनाच्या या घडीचा-
हा लढा निः शस्त्र क्रांतीचा असू दे

पाडण्याचा भिंत मी केला इरादा
आजचा प्रस्ताव शांतीचा असू दे

- कुमार जावडेकर

(ता. क. ही गझल मी पूर्वी मनोगतावर लिहिली आहे. काही शेर बदलल्यामुळे आता पुनः प्रसिद्ध करत आहे. )