गुलामी चित्रपटातील ती दोन दृश्ये

सेट मॅक्सवर गुलामी आतापर्यंत अनेकदा लागला. यापुढेही लागेल. 
परवा तो आणखी एकदा पाहण्यात आला. 
त्यातील दोन दृश्यांनी लक्ष वेधून घेतलं. 
मिथुन चक्रवर्ती धर्मेंद्र व कुलभूषण खरबंदाला भेटतो. त्यांना म्हणतो,
" तुमच्याबद्दल ऐकलं होतं पण तुम्हाला भेटलो नव्हतो. तुमची पार्श्वभूमी वेगवेगळी असली तरी तुम्हा दोघांची दुःखं सारखीच आहेत, तुम्ही एकाच व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करताहात, हे नव्याने कळलं."
त्यावर कुलभूषण खरबंदा म्हणतो,
" सर्व जखमी शेवटी एकाच इस्पितळात भरती होतात." 
रीना रॉयने धर्मेंद्रच्या पत्नीची भूमिका केली आहे. स्मिता पाटीलने धर्मेंद्रच्या लहानपणच्या वर्गमैत्रिणीची भूमिका केलेली आहे. 
धर्मेंद्र संघर्षरत असताना रीना रॉय स्मिता पाटीलकडून त्याला उद्देशून पत्र लिहून घेते. रीना रॉय एकेक वाक्य सांगते आणि स्मिता पाटील लिहून देते. 
लिहिता लिहिता स्मिता पाटील आठवणींत हरवते आणि अवचित म्हणून जाते:  तुझी खूप आठवण येते.
रीना रॉय : हो बरोबर. लिही. लिही.
स्मिता : हो लिहिलं ना. 
रीना : कधी लिहिलं?
स्मिता : हे काय आत्ताच.
   वास्तविक, वाक्य तिने लिहिलेले नसतं. वर्गमैत्रीण असल्याने धर्मेंद्रची तिला आठवण येत असते आणि आपसूकच ती भावना व्यक्त करून जाते. तो करीत असलेल्या बंडखोरीमुळे तिला  त्याच्याबद्दल सहानुभूतीही वाटत असते. स्वतःचा नवरा पोलीस असल्याने त्या सहानुभूतीला निराळा पदर असतो.  ' पत्रात लिहिलं आहे' या तिच्या म्हणण्यावर रीनाही विश्वास ठेवते आणि आपल्या मनातलं कसं काय हिने ओळखलं याचं तिला नवलही वाटतं. 
   हितचिंतक असूनही काहीही करू न शकत असल्याची हतबलता, आठवण आणि रीनाबद्दलचा आदर असे तिहेरी भाव स्मिता पाटील या दृश्यात दाखवते. स्मिताचं गहिरेपण आणि रीनाचं भाबडेपण एकाच वेळी दिसून जातं. दृश्यात स्मिताच्या जवळच पण किंचित खाली बसलेल्या रीनामुळे याच एकमेव दृश्यात चित्रपटाला असलेला अव्यक्त प्रेमपदर अधोरेखीत होतो. अनुरागिणी कशी असावी, हे कुणाला पाहायचं असेल हे एकच दृश्य पाहावं.        
​शूटिंगच्या वेळी जे.पी.दत्ता जेवायला गेलेले असताना हळूच गुलजारांनी येऊन पटकन दोन शॉट घेऊन टाकलेत की काय, अशी शंका येते.​ :))