जरा कुठे चाहूल लागता.....

गीत
वृत्त: समजाती-अष्टावर्तनी-वनहरिणी-मात्रावृत्त
मात्रा: ८+८+८+८= ३२ मात्रा
****************************************************
(१९६४ मधे आलेल्या ‘हकीकत’ चित्रपटातील मदनमोहनजींनी स्वरसाज चढवलेल्या व लता मंगेशकरांनी गायलेल्या कैफी आझमी यांच्या अलौकिक गीताचा मुक्त भावानुवाद)
जरासी आहट होती है तो दिल सोचता है....कहीं ये वो तो नहीं?
***************************************************

जरा कुठे चाहूल लागता.....
असे वाटते....ती तर नाही?... /ध्रु./

चोरपावलांनी कोणाची.......
साद उरामध्ये आली ही?
तिन्हिसांजेच्या आतच हृदयी......
सांजवात लावली कुणी ही?
तिचीच बहुधा धून असावी.....
तिचीच बहुधा खूण असावी......
असे वाटते ती तर नाही?
असे वाटते ती तर नाही? /१/

नजरेमध्ये भिरभिरतो हा......
एक चेहरा तोच लाघवी!
नसानसांमध्ये या उसळे.......
ठिणगी एकच हवीहवीशी!
कळे न कोणाच्या पदराची,
हवा स्पर्शुनी तनूस जाई?
असे वाटते ती तर नाही?
असे वाटते ती तर नाही? /२/

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१