भोवती माझ्या गळ्याच्या वास्तवाचा फास आहे!

गझल
वृत्त: व्योमगंगा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगागा
**************************************************

 भोवती माझ्या गळ्याच्या वास्तवाचा फास आहे!
 मी कशाचे स्वप्न पाहू? सर्व काही भास आहे!!

एक नुसता चेहरा पण, रंग पालटतो किती तो;
बिंब हृदयाचे म्हणू? की, फक्त तो आभास आहे!

केवढ्या घाईत माझी प्रेतयात्रा ही निघाली;
पाहिले नाही कुणी छातीत माझ्या श्वास आहे!

तूच चित्ती! तूच ओठी! माझिया स्वप्नातही तू!
तू अहोरात्री जिवाला लागलेला ध्यास आहे!!

कोंडवाड्यासारखी झाली स्थिती माझ्या उराची;
आजही वक्षात माझ्या कोंडलेला श्वास आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१