तुझ्याच डोळ्यांनी मी बघतो....

गीत
वृत्त: समजाती-अष्टावर्तनीऱ्हरिभगिनी/स्वरगंगा-मात्रावृत्त
मात्रा: ८+८+८+६=३०मात्रा
******************************************************

तुझ्याच डोळ्यांनी मी बघतो....
इकडे, तिकडे, चहूकडे!
जिथे पाहतो, तुला पाहतो....
इकडे, तिकडे, चहूकडे!! // ध्रु.//

श्वासाश्वासांमधे अताशा,
तुझाच परिमळ दरवळतो....
तुझ्या स्मृतींच्या धगीमुळे,
एकांत किती हा कळवळतो!
कधी तुला पाहीन असे,
सारखे मनाला ठसठसते....
तुझाच अंमल या हृदयावर....
तुझी आठवण किलबिलते!!
तुझीच वर्दळ, वावर बघतो...
इकडे, तिकडे, चहूकडे!
तुझ्याच डोळ्यांनी मी बघतो....
इकडे, तिकडे, चहूकडे!!  //१//

तिरीप तू आहेस उन्हाची....
तुझीच आहे मी छाया!
तुझ्याविना अस्तित्व कोणते,
मजला आहे? मी काया!!
तूच गझल माझी, मी तुजला....
एकसारखा गुणगुणतो!
शब्द शब्द माझा बघ, तुझिया....
विचारांमधे तळमळतो!!
तुला ऐकतो, तुला शोधतो....
इकडे, तिकडे, चहूकडे!
तुझ्याच डोळ्यांनी मी बघतो....
इकडे, तिकडे, चहूकडे!! //2//

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१