एक आहे बासरी मी....

गीत
एक आहे बासरी मी.......
वृत्त: राधा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गा
***************************************************

एक आहे बासरी मी....
श्वास तू माझा!
धून तू गाताच वाटे....
भास तू माझा!! //ध्रु.//

छेडल्या जातात....
हृदयातील या तारा!
अन् सुरांनी नाहतो
अभ्यंग गाभारा!!
ओठ  आपोआप गाऊ
लागती गाणी....
सर्व जखमांचीच होती
अंतरी लेणी!
तू सुरीले शिल्प माझे....
ध्यास तू माझा!
एक आहे बासरी मी....
श्वास तू माझा!!  //१//

तू सुरांच्या पावलांनी,
जीवनी आली....
जिंदगी साक्षात माझी
अन् गझल झाली!
मारव्याच्या आर्ततेने,
वाट मी बघतो!
तू कुठे आहेस? बघ, मी
भैरवी गातो!!
आस तू, अन् प्यास तू!
हव्यास तू माझा!
एक आहे बासरी मी....
श्वास तू माझा!!  //२//

मी गझल रेंगाळणारी
अंतरी तुझिया.....
पाहतो मी वाट
अधरांवर तुझ्या येण्या!
तू दिला ऐकेक मिसरा....
अन् गझल झालो!
भाव हृदयातील तुझिया
घेउनी आलो!!
तूच श्रद्धा, प्रियतमे...
विश्वास तू माझा!
एक आहे बासरी मी....
श्वास तू माझा!!
धून तू गाताच वाटे...
भास तू माझा!
एक आहे बासरी मी....
श्वास तू माझा!!  //३//

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१