केवढी करतात टाळाटाळ जखमा!

गझल
वृत्त: मंजुघोषा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा
**************************************************

केवढी करतात टाळाटाळ जखमा!
केवढा घेती भराया काळ जखमा!!

काळजामधली घरे...कोरीव लेणी!
तू तुझ्या दुर्मीळ या सांभाळ जखमा!!

जाहल्या माझ्याहुनीही त्या समंजस!
ठणकती होताच संध्याकाळ, जखमा!!

पौर्णिमा ती, चांदणे ते....सर्व स्मरते!
आणती खेचून ते आभाळ जखमा!!

वेदनाही लागती या रुणझुणाया....
बांधती पायांमधे त्या चाळ जखमा!

वाट दिनभर त्या तुझी बघतात वेड्या....
रात्र झाल्यावर तरी कवटाळ जखमा!

हे फुलांचे लाभले आंदण तुला रे!
गुंफुनी गजराच त्यांचा, माळ जखमा!!

कैकदा विसरूनही मी घाव जातो...
लागती वाटायला आबाळ जखमा!

काळजाची डायरी तू वाच माझी....
वाचताना मात्र साऱ्या टाळ जखमा!

सोबतीला पाहिजे कोणी तरी ना?
काळजामध्ये तुझ्या तू पाळ जखमा!

लागल्या वाटेमधे येऊ तुझ्या तर...
धीर करुनी सरळ तू फेटाळ जखमा!

रोज अंगाई नवी रात्रीस म्हण तू....
मग पहा निजतीलही नाठाळ जखमा!

शाल हास्याची लपेटावी खुबीने....
झाकलेल्या चांगल्या वाचाळ जखमा!

काळजाच्या दावणीला बांध त्यांना ......
बांधलेल्या चांगल्या ओढाळ जखमा!

घाव सारे का जगाला दाखवावे?
आणती भलताच केव्हा आळ जखमा!

एवढा विश्वासही ठेवू नये रे....
तोंड पाघळतात या तोंडाळ जखमा!

घाव करणारे किती अन् कोण होते?
लागल्या वाटू मला जंजाळ जखमा!

हृदय पाणवठा...स्मृतींची भांडणे ही!
वाटती साक्षात नळकोंडाळ जखमा!!

रोज रात्री झोपताना ऐकतो मी.....
सांगती गोष्टी मला वेल्हाळ जखमा!

गांजती हृदयास तिन्हिसांजेस माझ्या....
वाटती या चौकडीचांडाळ जखमा!

सहज मी पुसले....कुणी हे वार केले?
लावती हे केवढे पाल्हाळ, जखमा!

पोचतो ठणका जणू प्राणांत माझ्या....
थेट आत्म्याशीच जोडी नाळ जखमा!

घाव यारांनीच केले...भाग्य माझे!
साजरा करती उरी नाताळ, जखमा!!

वेदनांचाही लळा मज केवढा हा!
वाटती आता मला लडिवाळ जखमा!!

सूर्य आला घेउनी स्वप्ने नव्याने!
ऊठ, चल, आता तुझ्या गुंडाळ जखमा!!

शोधतो आहेस कोठे गझल वेड्या?
काळजाच्या सर्व तू धुंडाळ जखमा!

तू मधूमेही, तुझी तू काळजी घे!
तू निगूतीने तुझ्या खंगाळ जखमा!!

झेलले मी वार या छातीवरी पण....
वाटती साक्षात कर्दनकाळ जखमा!

खेळखंडोबा तुला मी काय सांगू?
फक्त हृदयातील काही चाळ जखमा!

रोज हृदयाच्या स्मशानी प्रेत जळते!
वाटती माझ्या चितेचा जाळ जखमा!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
    फोन नंबर: ९८२२७८४९६१