उरात एकेक घाव आहे!

गझल
वृत्त: जलौघवेगा
लगावली: लगालगागा/लगालगागा
**************************************************

उरात एकेक घाव आहे!
तुझ्या स्मृतींचा पडाव आहे!!

तुझी नजर खंजिराप्रमाणे....
तुझे पहाणे कटाव आहे!

अदा अदा जीव घेत आहे....
अता मलाही सराव आहे!

जिवानिशी रोज जात आहे....
तुझीच जीवास हाव आहे!

कितीकजण डुंबती मनाने.....
तुझ्या रुपाचा तलाव आहे!

तुझे मुरकणे....तुझे थिरकणे.....!
तुझा अघोरी बनाव आहे!!

नकार ओठीं, रुकार हृदयी....
कळे मला....बेबनाव आहे!

तुझा लळा लागला जिवाला....
तुझा गुलाबी स्वभाव आहे!

बटा कपाळी, खुलेच कुंतल....
अता कुणाचा टिकाव आहे?

तुझेच मिसरे....तुझ्याच गझला....!
तुझाच सारा प्रभाव आहे!!

उभार चण अन् उभार सौष्ठव....
मदनछडीचा उठाव आहे!

तुझ्या स्मृतींचीच साथ आहे!
तुझा, कळेना, अभाव आहे!!

भिजून तू चिंब येत आहे.....
अता न माझा निभाव आहे!

बिशाद लावेल नजर कोणी....
तुझा गुलाबी दबाव आहे!

कसे तुला एकटीस गाठू?
कळ्याफुलांचा जमाव आहे!
कळे न स्वप्नात काय बघशी?
अजूनही तो तणाव आहे!

तुलाच गझलेत मी चितारे!
तुझाच हृदयी भराव आहे!!

सुवर्ण सुद्धा फिकेच वाटे....
तुझ्या पुढे ना टिकाव आहे!

कुणास हासू, कुणा इशारा.....
जणू तुझा हा लिलाव आहे!

खमंग घमघम, अवीट गोडी!
तुझ्यात शाहीपुलाव आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१