पहा ऐकलेही धुक्याने!

गझल
वृत्त: प्रमीला
लगावली: लगागा/लगागा/लगागा
***************************************************

पहा ऐकलेही धुक्याने!
उठवले धुक्याला उन्हाने!!

नजर बोलली सर्व काही....
नजर ऐकते ते मुक्याने!

सदा झुळझुळे...गीत गाई....
शपथ घेतली ती झऱ्याने!

पुन्हा ओळखू एकमेकां....
पुन्हा आज भेटू नव्याने!

जसा लागला सूर्य तळपू....
दडी मारली काजव्याने!

पहा तोतये एक झाले....
विहरती कसे ते थव्याने!

जसा ठेवला पिंड माझा....
झडप घातली कावळ्याने!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१