पडझड होवो भले कितीही, शाबूत परी, चौथरा हवा!

गझल
वृत्त: समजाती-पद्मावर्तनी-वनहरिणी-मात्रावृत्त
मात्रा: ८+८+८+८=३२मात्रा
******************************************************

पडझड होवो भले कितीही, शाबूत परी, चौथरा हवा!
अंग टाकण्या, एक सुरक्षित विश्वासाचा, आसरा हवा!!

कुठे मागतो, तुझ्या मनाचा महाल सखये, रहायला मी?
जरा टेकण्यासाठी तुझिया हृदयाचा मज, कोपरा हवा!

हवे कशाला, असे घोळके? त्यापेक्षा एकांत बरा हा!
नको बेगडी दोस्त मंडळी, शत्रू दे पण, तो खरा हवा!!

खरेच सुंदर, सुरेल झाली, आयुष्याची या अस्ताई.....
उतार माझ्या वयास आता, तसाच सुंदर, अंतरा हवा!

किती चरे, सुरकुत्या किती या, गतकाळाने दिल्यात मजला.....
कुठून आणू? तुला आरशा, तो पूर्वीचा, चेहरा हवा!

जरी कितीही भरारलो मी, गगनामध्ये स्वैर विहरलो.....
तिन्हिसांजेला परतायाला पण, प्रेमाचा, पिंजरा हवा!

नकोस इतके दूर उडू की, परतायाला कठीण व्हावे.....
उघड्या डोळ्यांनी बघ आहे, कशी भोवती, पाखरा हवा!

इतके सात्विक भांडण नाही शोभत वेडे प्रेमामध्ये!
दोघांच्याही काळजावरी, गडद लालसर, तो चरा हवा!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१