बिनधुळीचा आरसा मी पाहिला!

गझल
वृत्त :मेनका
लगावली: गालगागा/गालगागा/गालगा
******************************************************

बिनधुळीचा आरसा मी पाहिला!
चेहरा, दिसतो कसा, मी पाहिला!!

फोडतो बाहेर डरकाळ्याच तो....
पण, घरी होतो ससा...मी पाहिला!

कासवाने त्या शिखर बघ, गाठले....
राहिला मागे ससा...मी पाहिला!

धावते भरधाव कासव पाहिले....
कूर्म झालेला ससा मी पाहिला!
(कूर्म म्हणजे कासव)

राउळाचे मी तुझ्या कासव जणू.....
कूर्मदृष्टीचा ठसा मी पाहिला!
(कूर्मदृष्टी म्हणजे कृपादृष्टी)

गरिबही श्रीमंत जेव्हा जाहले....
पालथा उलथा पसा मी पाहिला!
(उलथा/पालथा पसा म्हणजेउधळेपणाचे वर्तन)

प्रार्थना माझी फळा आली पहा....
गच्च भरलेला पसा मी पाहिला!

जाणतो देवा, तुझ्या मी भावना....
भावपुष्पांचा पसा मी पाहिला!

तोंडचा मग घास मी त्याला दिला.....
लेकराचा तो पसा मी पाहिला!

थोर विद्यार्थी किती हे जाहले.....
आज माझाही ठसा मी पाहिला!

तोतयांना ठसदिशी तो लागला....
आज, तो माझा ठसा मी पाहिला!

का न मी डोळ्यावरी येणार रे?
ठणकता माझा ठसा मी पाहिला!

काय ठसकेबाज ही माझी गझल!
ठसठसे माझा ठसा...मी पाहिला!!

दर्शनी माझी उपेक्षा चालली....
अंतरी त्यांच्या ठसा मी पाहिला!

का न मी उरणार येथे चौकडे?
हा पहा माझा ठसा...मी पाहिला!

मी तडा जाऊ न केव्हा द्यायचो!
दृढ त्यांचा भरवसा मी पाहिला!!

तो तमाला वाट माझ्या दावतो...
एक अंधुक कवडसा मी पाहिला!

लोक भिजले शायरीने माझिया.....
कोरडा माझा घसा मी पाहिला!

और भ्रष्टाचार तो मी पाहिला....
भूक गिळणारा घसा मी पाहिला!

शेत कणसांचे किती कोमेजले!
पीक धरलेला घसा मी पाहिला!!
(पीक धरलेला घसा म्हणजे पर्जन्याअभावी कणसे खुरटणे)

अजगरासम ही महागाई जणू....
वासलेला तो घसा मी पाहिला!
(वासलेला/पसरलेला घसा म्हणजे उघडलेले तोंड)

शैशवाचा उंबरा ओलांडला....
आज फुटलेला घसा मी पाहिला!
(घसा फुटणे म्हणजे वयात आल्यावर आवाज बदलणे)

काय डोकेफोड केली बोलुनी....
बैसलेला हा घसा मी पाहिला!
(घसा बसणे म्हणजे आवाज घोगरा होणे, अति बोलण्याने)

केवढा बिनघोर झोपा काढतो.....
वाजणारा तो घसा मी पाहिला!
(घसा वाजणे म्हणजे घोरणे)

शोधतो आजन्म ज्याला आजही.....
चेहरा नाही तसा मी पाहिला!

शोधतो चौफेर मी गझले तुला.....
चेहरा नाही तसा मी पाहिला!

लाभला गझलेस माझ्या चेहरा....
तो परी नाही, जसा मी पाहिला!

सर, भटांची, त्या व्रताची, ना कुणा!
भाग्य माझे, तो वसा, मी पाहिला!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१