जाहल्या कित्येक गोष्टी, कैक गेल्या राहुनी......

गझल
वृत्त: देवप्रिया
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगा
****************************************************

जाहल्या कित्येक गोष्टी, कैक गेल्या राहुनी......
या निमित्ताने तरी, झाले जगाला पाहुनी!

  अग्निदिव्यातून गेलो कैकवेळा लीलया......
जीवघेण्या यातनाही, कैक झाल्या साहुनी!

दाद लोकांनी दिली, गझलेस टाळ्या लाभल्या.......
अंतरंगातील माझ्या, काव्य मोठे याहुनी!

मी जसा आहे तसा, आहे बरा, जो काय तो!
झूल कुठलीही मला, विद्रूप वाटे त्याहुनी!!

ऐकणाऱ्याच्या जिवाचा, का न व्हावा दाह रे?
गझल या ओठांत आली, हृदय माझे दाहुनी!

सावलीला मी उभा पण, सोसतो आहे झळा........
कोण जाणे, काय हृदयी, रोज निघते दाहुनी?

हे म्हणू काळीज की, ही एक विद्युतदाहिनी?
धूर गझलेचा दिसे, सर्वस्व माझे दाहुनी!

सौख्य माझेही मला माहेरवाशिण वाटते......
घर सुने, जाताच होते....ते घरी या राहुनी!

पैलतीराला कसे पोचू? न ही चाले मती!
ऐलपैलातील गेला पूल नुकता वाहुनी!!

केस ओले मोकळे, झटकीत ती बसली जणू!
बैसली आहे उन्हाला, गझल माझी नाहुनी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१