माझिया ओठात आहे....

गझल
वृत्त: मनोरमा
लगावली: गालगागा/गालगागा
****************************************************

माझिया ओठात आहे....
तेच, जे, पोटात आहे!

का रुसू खेळामधे मी?
खेळण्याची बात आहे!

सर्व धेंडांची खरी मज.....
माहिती औकात आहे!

कावळ्यांना पिंड द्याया.....
शिजवला मी भात आहे!

तोतये सारे दचकले.....
टाकली मी कात आहे!

झिंगतो मस्तीत माझ्या......
शायराची जात आहे!

काय मी स्वादिष्ट इतका?
जग चवीने खात आहे!

शह असा काही दिला मी.....
चक्क झाली मात आहे!

जन्मदिन हरसाल येतो......
काय अप्रुप त्यात आहे?

ना छटाकाचे गझलपण.......
पण, गझल वृत्तात आहे!

वेदनेच्या या झुल्याने.....
जिंदगी झोकात आहे!

या पिछेहाटीत माझ्या.....
फक्त माझा हात आहे!

पानवाला टळत नाही......
चौकडे चौकात आहे!

मस्त एकांतामधे मी.....
माझिया थाटात आहे!

बोललो की, शेर होतो.....
गझल अंगांगात आहे!

हात देणे, वा, न देणे.....
ते तुझ्या हातात आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१