दुष्काळ, भूक, तृष्णा....प्रश्नावलीप्रमाणे!

गझल
वृत्त: आनंदकंद
लगावली: गागालगा/लगागा/गागालगा/लगागा
**************************

दुष्काळ, भूक, तृष्णा....प्रश्नावलीप्रमाणे!
वाट्यास जन्म आला विझल्या चुलीप्रमाणे!!

साठीतही उधाणे शैशव अजून माझे........
जपले उरात शैशव मी बाहुलीप्रमाणे!

आयुष्य की, म्हणावे हा ग्रीष्म बारमाही?
आभास गारव्याचा पण, सावलीप्रमाणे!

स्वप्नात रोज येते तारुण्य सांडलेले.........
दुरुनी मला पहाते ते वाकुलीप्रमाणे!

प्रत्येक पोर मजला वाटे मुलाप्रमाणे.........
प्रत्येक माय वाटे मजला मुलीप्रमाणे!

पंगत अरे, कशाची? झुंबड जणू भुकेची!
वाटे हरेक जेवण मज दंगलीप्रमाणे!!

मी एकटाच तेथे कमळासमान होतो!
होता जमाव भवती तो दलदलीप्रमाणे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१