ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की ह्यांच्या हस्ते कलातीर्थ पुरस्कार - वादनगौरव प्रदान

कुठल्याही गाण्याच्या प्रसिद्धी नंतर लोकप्रियता मिळते ती गायक, गीतकार व संगीतकारांना, परंतु गाणं ते एक टीमवर्क आहे. ते लोकप्रिय होण्यासाठी त्याच्या संगीताला साथ केलेल्या वादकांचा त्यात सिंहाचा वाटा असतो. त्यामुळे त्याचे श्रेय हे वादकांना देखिल तितकेच मिळाले पाहिजे. असे मनोगत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की ह्यांनी व्यक्त केले.
थर्ड बेल एंटरटेनमेंट तर्फे दिल्या जाणाऱ्या "कलातीर्थ पुरस्कार" वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. थर्ड बेल एंटरटेनमेंट च्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त वादन क्षेत्रातील ११ दिग्गज वादक कलाकारांना काल कलातीर्थ पुरस्काराने संगीतकार अशोक पत्की ह्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळी थर्ड बेल एंटरटेनमेंटचे स्वप्नील रास्ते, प्रज्ञा रास्ते, पुष्कर देशपांडे व सोलापूर नाट्य परिषदेचे प्रशांत बडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
माउली टाकळकर (टाळवादक), रमाकांत परांजपे (व्हायोलीन वादक), सचिन जांभेकर (हार्मोनियम वादक), राजू जावळकर (तबला वादक), विवेक परांजपे (सिंथेसायझर वादक), अमर ओक(बासरी वादक), केदार मोरे(ढोलकी वादक), राजा साळुंके (तालवादक), रितेश ओहोळ (गिटार वादक), राजीव परांजपे (ऑर्गन वादक), अभय इंगळे (ऑक्टोपॅड वादक) ह्या कलाकारांना कलातीर्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच मनोरंजन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेफ विष्णू मनोहर, रंगभूषाकार गणेश जाधव व प्रकाशव्यवस्थापक सुजय भडकमकर ह्यांचाही गौरव करण्यात आला. 
पत्की म्हणाले, की कुठलेही गाणे चांगले की वाईट, हे प्रेक्षक लगेचच ठरवून टाकतात पण खरेतर, प्रत्येक गाण्यामागे संगीतकार व गायकासह अनेक जणांची मेहनत असते. उत्तम गाणं लोकप्रिय होइलच असे नाही किंवा लोकप्रिय गाणं उत्तम असेलच असे नाही पण उत्तम असो वा लोकप्रिय दोन्ही प्रकारच्या गाण्यात वादनकला ही महत्त्वाचीच. आज ह्या ठिकाणी ११ वादकांचा एकत्रित सत्कार होतो आहे हे मला प्रथमच घडते आहे असे वाटत आहे. असे सांगत वादकांचा उत्तरोत्तर गौरव व्हायला हवा असे मत व्यक्त केले.
पुरस्कार सोहळ्यात समीप कुलकर्णी व गणेश तानवडे ह्यांची सतार व तबला जुगलबंदी आणि आगामी चित्रपट रमा माधव ह्यामधील मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी आदी कलाकारांशी मुक्त गप्पा गोष्टी ह्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वप्नील रास्ते ह्यांनी प्रास्ताविक केले, मोनिका भट ह्यांनी सूत्रसंचालन केले व प्रज्ञा रास्ते ह्यांनी आभार मानले. 
सोहळ्याचे आयोजन काल डी. २६ जुलै रोजी भरतनाट्य मंदिर, पुणे येथे करण्यात आले होते.