माझा प्रवास - ऑस्ट्रिया - मॉतहाउसेन

नमस्कार, 
मी आतापर्यंत कधीही कसलेही लिखाण केलेले नाही. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तरी आपण यांवर जरूर प्रतिक्रिया / प्रतिसाद द्यावेत,म्हणजे मला थोडासा धीर येईल. ('कोणीतरी वाचणारे आहे आणि कान पकडणारे पण आहे' असे वाटेल. !! )
गेल्या ४/५  महिन्यांपासून मी लिंझ, ऑस्ट्रिया येथे नोकरीनिमित्त राहतोय. हे शहर तसं पर्यटकांच्या दृष्टीने  फार प्रसिद्ध नाही. पण ऑस्ट्रियाची पुष्कळ कारखानदारी इथूनच चालते.इथे सिमेन्स, वोस्ट अल्पाइन, बोरिआलिस, अर्सेलर वगैरे कंपन्यांचे मोठे मोठे उत्पादन प्रकल्प आहेत.  
या शहराला मोठा इतिहास आहे. सर्वात महत्त्वाचा धागा म्हणजे हिटलरच्या लहानपणीचं गाव "लिओंडींग" हे लिंझचे एक आता उपनगर आहे.  "पसाव" नावाचे आणखी एक उपनगर त्याच्याशीच निगडित आहे. त्याच्या आईवडीलांचे एक छोटे घरही आहे. 
तर या अश्या लिंझच्या जवळच कुप्रसिद्ध "मॉतहाउसेन" ही छळछावणी होती. तिची ही माहिती  
दुसऱ्या महायुद्धातील , ऑस्ट्रियातील सर्वात मोठी छळछावणी 'मॉतहाउसेन' ही लिंझपासून  फक्त ३० कि.मी. अंतरावर आहे. या छावणीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही गावाच्या अतिशय जवळ आहे/होती., या छावणीचे दोन भाग होते. तटबंदीच्या बाहेर 'हिमलरची कुप्रसिद्ध फौज (SS)" आणि आत मध्ये कैद्यांची श्रेणीनुसार सुरक्षा रचना. संशयित कैद्यांची 'विशेष चौकशी' तटबंदीच्या बाहेर एका कक्षात हिमलरचे सैनिक करत असत आणि कैदी जर मेला तर सरळ उचलून दगडांच्या खाणीत ढकलून देत असत. 
या ठिकाणी काम करणारे पुष्कळसे सैनिक हे ऑस्ट्रियन होते आणि महायुद्धानंतर झालेल्या चौकशीत,  त्यातील कोणालाही त्याबद्दल कसलीही शिक्षा मिळाली नाही. यातील एक ऑफिसर काही वर्षांपूर्वी इथे भेट देउन गेला. त्याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन एक मुलाखत दिली.त्यात त्याने आपण केलेल्या कामाबद्दल गर्व व्यक्त केला आणि "मी माझे काम केले" असे विचार व्यक्त केले. 
इथे वरच्या दर्जाच्या कैदी श्रेणी मध्ये साहजिकच जर्मन आणि ऑस्ट्रियन कैदी आणि सर्वात खालच्या पातळीवरती ज्यू कैदी होते.  मरणाऱ्या कैद्यांमध्ये ९०% ज्यू होते हे वेगळे सांगायला नकोच!! साधारणपणे १लाख कैदी येथे मारले गेले आणि १.५ लाख शेवटी बंदी म्हणून मिळाले. 
या छावणीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे १ मोठे फुटबॉलचे मैदान होते आणि जर्मन सैन्याची  'मॉतहाउसेन' ही टीम इथे सराव करायची (आतमधील मरणोन्मुख कैदी एका खिडकीतून हा सराव आणि त्या नंतर होणारा जलसा (नाचकाम, दारूकाम, इ. इ. ) बघायचे). इथे स्थानिक मंडळींना फुटबॉल बघण्यासाठी बसायची जागा होती. काही छोट्या स्पर्धासुद्धा येथे झालेल्या आहेत. 
१९४५ नंतर याच ठिकाणी असंख्य मृत / अनोळखी शवांना मूठमाती देण्यात आली. हे सर्व देह ओळखण्याच्या पलीकडचे होते. ती जागा, त्यांसंबंधित छायाचित्रे पाहताना अंगावर शहारा येतो. हे सर्व फुटबॉलचे मैदान त्या शवांनी भरून गेले .  
इथेच एक मोठा पोहण्याचा तलावही होता. अर्थात तो ही बाहेरच होता आणि तो जर्मन सैनिकच वापरत होते. तोही तलाव पाहता येतो. 
कैद्यांच्या खोल्या अतिशय छोट्या आणि एका ठराविक पद्धतीने बांधलेल्या होत्या. ४०० जणांच्या एका खोलीला फक्त १० शौचालये / स्नानगृहे होती. त्या खोल्यांना उबदार ठेवण्याची कोणतीही सोय तेथे नव्हती. नंतर मोठ्या बॉयलरचा उपयोग होऊ लागला. ( बॉयलरचे इंधन म्हणून मृत देह वापरीत असत. ) 
या ठिकाणी अनेक देशांमधले कैदी ठेवले होते. जे मारले गेले, त्यांची स्मृती म्हणून अनेक देशांनी त्यांच्या देशवासियांच्यासाठी एक एक स्मारक उभारलेले आहे. ही स्मारकेसुद्धा बघण्यासारखी आहेत. 
मॉतहाउसेनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तेथील शेवटच्या जिवंत कैद्यांचे अनुभव आणि त्याचे वापरण्याचे कपडे, वस्तू, जागेच्या आठवणी, जर्मन सैनिकांनी तेथे असताना काढलेली छायाचित्रे, अमेरिकन सैन्याने या जागेचा ताबा घेतल्यानंतर तेथील परिस्थितीचं त्यांनी केलेले निवेदन, त्यांनी काढलेली छायाचित्रे यांचे तेथे उभे केलेले कायमस्वरूपी प्रदर्शन!! ते बघताना अंगावर काटा येतो. पण तरीही हे स्मारक अतिशय योग्य पाडतीने राखलेले आहे. 
एकदा अवश्य भेट द्यावी  व इतिहास उजळणी करावी. 
अस्तु !!!