असे हे शेजारी

नवीन नोकरी मिळाली, नवे घर मिळाले आणि नवे शेजारी.
     एक दिवस रात्री गाढ झोपेत असताना गूढ आवाज यायला सुरुवात झाली. आधी वाटले, स्वप्नातच कोणीतरी आवाज करत आहे. नंतर वाटले, गजराच्या आवाजात काहीतरी बिघाड झालेला दिसतोय. दोन्ही गैरसमजच निघाले. जगातील सगळे आवाज एकवेळ बदलतील पण गजराचा आवाज कधीही बदलत नाही. तर तो गूढ कुई कुई आवाज कशाचा आहे, कळेना. दोन रात्री तशाच गेल्या. एक दिवस सायंकाळी घरी आलो तर माळ्यावरचे एक खोके हलत होते. मी ते उघडून पाहिले नाही. दुसऱ्या दिवशी सायंकाळी चक्क एका खारीने माळ्यावरून उडी घेतली. तिची उडी घेतानाची मूर्ती अजून डोळ्यांसमोरून  जात नाही. उडी मारत असताना तिच्या शेपटीचा हेलिकॉप्टरसारखा पंखा झालेला होता. ही खार कुठून आली, कळेना. माळ्यावर चढून ते खोके खाली घेतले आणि सरळ बाहेरच्या गॅलरीत ठेवले तर अजून दोन खारी टुणकन उडी मारून बाहेर पळाल्या. दिवस उन्हाळ्याचे होते त्यामुळेच बहुधा खारींनी माझ्या घराला स्वतःचे थंड हवेचे ठिकाण बनविले होते. माळ्यावर चढून नीट पाहिले तर लक्षात आले की, माळ्याच्या भिंतीला एक भोक आहे व तेथून तयार झालेले भुयार घराबाहेरच्या एका जलवाहिनीपाशी उघडत आहे. या जलवाहिनीचा उपयोग या खारी चढउतार करणे व अधूनमधून गळक्या ठिकाणचे पाणी पिणे या गोष्टींकरिता करत असाव्यात. सिव्हिल विभागाला कळवले. त्यांनी एका आठवड्यात सगळा बंदोबस्त करून सर्व भोके बूजवून टाकली. ते झाल्यावर खारींचे आत येणे बंद झाले. त्यांनंतर घराभोवताली मला दोन-तीन खारी दिसल्या तर त्या माझ्याकडे रागाने पाहत आहेत व 'लवकरच आम्ही आंदोलन करणार आहोत', असे म्हणत आहेत की काय, असे वाटत राहिले. 
    या खारींप्रमाणे माकडे कॉलनीतील नेहमीचे शेजारी. घर उघडे दिसले रे दिसले की सरळ आत शिरून कचराकुंडी शोधायची, बाहेर घेऊन यायची व ती अख्ख्या टोळीने फस्त करायची, हा त्यांचा नेहमीचा शिरस्ता. कॉलनीतील लोकांना हे माहीत झाल्यामुळे गॅलरी कोणीही उघडत नसे. मी या विषयात नवा असल्याने एका रविवारी सकाळी माझी गॅलरी उघडी राहिली. मी तिथेच खुर्ची टाकून वृत्तपत्राची पुरवणी वाचत होतो. खुर्चीच्या डाव्या बाजूला गॅलरी. गॅलरीत वरच्या बाजूला काहीतरी लोंबकळत होते. मला वाटले, साप. प्रश्न पडला, हा वर चढतोय की खाली उतरतोय. लगेच लक्षात आले की, ही माकडाची शेपटी आहे. वर पाहिले तर ते माकड माझ्याकडे निश्चल नजरेने पाहत होते. गॅलरीच्या बाहेर आणखी एक मर्कटराज स्थिर चित्त होऊन माझ्याकडे पाहत होते. माझ्या पुढच्या हालचालीवर त्यांची पुढची हालचाल अवलंबून होती. मी हळूच आत आलो व दार लावले. सहसा लोक 'हाडहूड' करून हुसकवून लावतात. माझे लक्षच गेले नसते तर या माकडांनी आपल्या भाईबंदांना बोलावून आत शिरण्याची एक मस्त योजना बनवली असती. तेव्हापासून रविवारची पुरवणी मी गॅलरीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हात वाचण्याचा निर्णय रद्द केला. माकडांची टोळी सकाळच्या वेळी कॉलनीच्या एका दिशेने येते. झाडांमागून झाडे मागे टाकत टाकत, फळे चाखत चाखत माध्यान्हीला कॉलनीच्या दुसऱ्या बाजूला नाहीशी होते.   
   पावसात मोर नाचतात, असे ऐकून होतो. मला मात्र मार्च एप्रिलमध्ये कॉलनीला लागून असलेल्या रानात खूपदा मोर दिसले. त्यांच्या केकावलीनेच जाग येते. मोरांच्या व कोकीळाच्या आवाजातील फरक अगदी सुरुवातीला कळत नसे. मोर 'कुहू कुहू' करत नाहीत पण 'कू, कू' असा काहीतरी आवाज करतात. सकाळचे सहा ते दहा या वेळात त्यांचा रियाज चालतो. त्यांना पाहायचे असेल तर आमच्या इमारतीच्या गच्चीवर जावे लागते. कमीत कमी दोन ते चार मोर दिसतात. कधी जास्तही दिसतात. एखादा पिसारा फुलवतो. पहिल्या थेंबांची चाहूल लागली की, हे मित्रमैत्रीणमंडळ नाहीसे होते. एखादाच मोर एखाद्या मोठ्या झुडुपाच्या आडोशाला उभा राहिलेला दिसतो.
   खारी, माकडे, मोर उन्हाळ्यात, हिवाळ्यात दर्शन देतात. एक जनावर असे आहे की, ते प्रत्येक ऋतूत दिसते. या जनावराला कोकणात 'जनावर' म्हणतात आणि देशावर 'साप'. एकदा रात्री बाहेरून जेवून आलो तर दरवाजात स्वागताला एक हिरवे पिल्लू. वळवळ सुरु होती. दारापलीकडे उतार होता. जपून दरवाजा उघडला. पाणी थोडे गरम केले व जमिनीवर ओतले. ते पिल्लू सरळ पुढे वाहत गेले. तेव्हापासून पायाखाली पाहिल्याशिवाय पाऊलच उचलायचे नाही, अशी सवय लागली. उन्हात आपण चालत असतो आणि कोपऱ्यात ऊन जरूरीपेक्षा जास्त चमकले की समजून जावे. तिथे शून्याचा आकडा तयार झालेला असतो आणि हलत असतो. तो रानाचा भाग असला तर लोक त्यांना नैसर्गिक अधिवासात तसेच राहू देतात. मात्र, दुर्दैवाने साप रस्त्यावर आले तर लोक लगेच काठी घेऊन तयार राहतात. आमच्या कॉलनीच्या बाजूला रस्ता आहे. पावसाळ्यात जमिनीच्या रंध्रारंध्रात पाणी शिरते आणि साप या रस्त्यावर येतात. रात्र असते, पाऊस तुफान असतो, गाड्यांना दिवे नसतात, गाड्या वेगात असतात, दोन तीन साप रस्त्यावर येतात आणि गाडीखाली चिरडून मरण पावतात. दुसऱ्या दिवशी या शवांचे नैसर्गिक विच्छेदन झालेले दिसते. त्यावर कुत्रा, बगळा इत्यादींचे भोजन आठवडाभर सुरु असते. 
    मांजर फारसे दिसले नाही. अलीकडे एक पिल्लू मात्र जवळपासच्या इमारतींजवळ असते. तेथील काही रहिवासी त्याला दूध देतात. इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ते तेथेच बसून असलेले दिसते. पावसाळ्यात सापांबरोबर बेडूक, मुंग्या, गोम, खेकडे, विंचू तर नियमितपणे भेटीला येतात. पैसा हा लाल कीटक नेहमीप्रमाणे गठ्ठ्याने दिसतो. जून महिन्याचा स्वभावच मुळी दुहेरी आहे. जूनचाच कशाला सगळ्या पावसाळ्याचाच स्वभाव दुहेरी आहे. 'परिसरात भरपूर पाऊस झाला असून सर्वत्र आल्हाददायक वातावरण आहे' या बातमीशेजारीच 'सर्पदंशामुळे, विंचूदंशामुळे मृत्यू' ही बातमी न चुकता प्रसिध्द झालेली असते. 
    चिमण्या, कावळ्यांचे अस्तित्व आमच्याकडे नगण्य आहे. निळा कंठ असलेला एक पक्षी मात्र बरेचदा दर्शन देतो. त्याला झाडांच्या फांद्यांपेक्षा तारा जास्त पसंत आहेत की काय, न कळे. तारांवर बसूनच जीवनाचा आनंद घेत असतो. काही जण त्याला 'खंड्या' म्हणतात काही जण 'किंगफिशर'. तो खरा कोण आहे, हे कोणाला ठाऊक नसावे. पिवळा आणि पांढरा असे रंग असलेला एक पक्षीही दिसतो. या पक्ष्याची चोच पिवळी धमक आणि लांब आहे. एकदा खिडकीजवळच्या झाडावर तो येऊन बसला होता. मीही खिडकीत होतो. योगायोगाने कॅमेराही खिडकीजवळच होता आणि नशिबाने तो 'चार्जड'ही होता. मी लगेच ध्वनिचित्रमुद्रण करून ठेवले. बगळेही बहुसंख्येने दिसतात. थोडेसे जरी पाणी कुठेही साठलेले असले तरी बगळ्यांची शुभ्र चादर भवतालच्या हिरवळीवर पसरते आणि चिकाटीने पाण्यातले बारीक बारीक किडे वेचून खाण्याचे काम सुरु होते.   
   इमारतीच्या बाजूला घुबड नियमित येते. सूर्य पूर्ण मावळल्याशिवाय ते बिल्कुल आवाज करीत नाही. रात्र जसजशी वाढत जाते तसतसा त्याच्या आवाजाला अधिक गहिरेपणा येत जातो. इमारतीतील एखादा शेजारी दिसला नाही की जेवढे चुकचुकल्यासारखे वाटणार नाही, तेवढे घुबडाचा आवाज आला नाही तर वाटते. वातावरण गूढ करण्यात त्याच्या आवाजापेक्षा दिसण्याचाच वाटा बराच आहे. बोलतानाही बरेच लोक 'अजि म्यां ब्रम्ह पाहिले' च्या चालीवर 'आज मी घुबड पाहिले' असे ऐकवतात. बरोबर आहे. दुर्मीळाची चर्चा अधिक. 
   दोन्ही बाजूला सारखेपणा म्हणजे काय हे फुलपाखराकडून शिकावे. हेच 'सिमेट्री' चे उत्तम उदाहरण. दोन्ही पंख किती सारखे असावेत, याला काही सुमार ! घराजवळ अशी फुलपाखरे बरीच दिसतात. एकदा जवळच्या जिन्यात असेच एक फुलपाखरू बसलेले होते. नेहमीपेक्षा आकार मोठा होता. पंखांना काळा रंग. त्यावर पांढरी नक्षी. चिमटीत पकडायला गेले तर चिमूट पूर्ण झाकून जाईल इतके मोठे होते. कुणीतरी याला राक्षसी फुलपाखरू म्हटल्याचे आठवते. 
     
     अजिबात हालचाल न करता या सर्व सजीवांना नुसते पाहिले तरी आतल्या आत माहितीचा एक मोठा खजिना तयार होईल. मानवाने फक्त लांबूनच या सजीवांच्या निरीक्षणाचे एक पथ्य जरी पाळले तरी निसर्ग विशाल दुवा देईल.