दर्द अनेक, दवा एक - साहित्य

पहिले शेतकरी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. श्री मुटे यांनी त्याचा विस्तृत अहवाल दिला आहे. उद्घाटन थाटामाटात झाले असे त्यांनी स्वत:च लिहीले आहे. व सोबतच्या छाया चित्रातून पण ते दिसून येते. आपण शेतकरी साहित्य संमेलन करणार आहोत असा मानस श्री मुटे यांनी पूर्वी व्यक्त केला होता व त्या वर काही चर्चा पण झाली होती. आपण अमुक एक करावे अशी इच्छा असणे, व ते प्रत्यक्षात करून दाखविणे यात खूप फरक असतो. एवढ्या मोठ्यां प्रमाणावर संमेलन आयोजित करणे हे फार कठीण काम असते. निधीची व्यवस्था, हॉल व त्यातील सर्व व्यवस्था, आमंत्रितांची निवास-भोजन व्यवस्था, वेळपत्रका प्रमाणे कार्यक्रम पार पाडणे, मीडीया मेनेज्मेण्ट, . . . अनेक गोष्टी असतात व यातील कोणतीही गोष्ट सोपी नसते. तर हे सर्व यशस्वी केल्या बद्दल श्री मुटे यांचे अभिनंदन.

पण या संमेलनाचा साहित्याशी काय संबंध होता हे मात्र आधी पण कळले नव्हते, व अजूनही कळले नाही. वृतांतातून काही अंश पाहा.

उद्घाटक डॉ. विट्ठल वाघ म्हणले देशात शेतकऱ्यांचा पक्ष उरलेला नाही. . . . . भारत हा कृषिप्रधान देश असूनही ८६ टक्के शेती कोरडवाहू आहे. देशात स्वतंत्र रेल्वे बजेट आहे, परंतु स्वतंत्र कृषी बजेट नाही; यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असू शकेल.

सरोज काशीकर म्हणाल्या, शेतकरी जोपर्यंत स्वबळावर उभा राहणार नाही, तोपर्यंत या देशाचा आर्थिक विकास होणे शक्य नाही. जे साहित्य शेतकऱ्यांसाठी लिहिले ते वास्तववादी नाही. ते केवळ मृगजळ आहे. डोळ्यांवरील हिरवी पट्टी काढण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे, यापुढे लेखणी हे हत्यार म्हणून वापरले पाहिजे, तरच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला धार येईल.

काही वृत्त पत्रातील मथळे
- कृषी क्षेत्र की उपेक्षा दुर्भाग्यपूर्ण
- सिंचना साठी पाणी नसणे हेच शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण
- शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थ संकल्प मांडा
- गांवे ओस पडत आहेत तर शहरे सुजत आहेत हे सर्व गांधीजींचे न ऐकल्याने होत आहे

शेतकऱ्यांचा पक्ष असावा; शेतकरी स्वबळावर उभा राहावा; देशाचा आर्थिक विकास व्हावा; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला धार यावी; कृषी क्षेत्राची उपेक्षा होऊ नये; शेती कोरडवाहू असू नये; सिंचना साठी पाणी असावे; शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थ संकल्प असावा; गांवे ओस पडू नयेत; शहरे सुजू नयेत; गांधीजींचे तर ऐकावेच; . . . . . हे सर्व मान्य. सर्वांनी शेतकर्यांच्या समस्या मांडल्या. अवश्य मांडाव्यात. पण याचा साहित्याशी काय संबंध आहे ?

भाषणां मध्ये काही खोल विचार होता असे वाटत नाही. यातून अनेक चमत्कारिक विधाने समोर आली. जसे

उद्घाटक डॉ. विट्ठल वाघ म्हणाले "पंजाबराव देशमुखांनंतर शेतकऱ्यांना दुसरा पुढारी मिळालेला नाही"  मग शरद जोशी, राजू शेट्टी काय आहेत? पुढारी नाहीत का शेतकऱ्यांचे नाहीत? 

सरोज काशीकर म्हणाल्या "आता आम्हाला कादंबरी नको, अर्थशास्त्र हवे" शेतकर्यांना आता अर्थशास्त्रच हवे हे मला पूर्णपणे मान्य आहे. पण साहित्य म्हणजे कथा कादंबरीच असते, अर्थशास्त्र नाही. साहित्य संमेलनात "आम्हाला कादंबरी नको" असे म्हणणे म्हणजे गंमतच आहे

डॉ. वाघ पुढे म्हणाले "पाण्या शिवाय शेती होऊ शकत नाही हे संत तुकारामांनी लिहून ठेवले. संतांना जे उमगले ते नेत्यांना समजले नाही." नेत्यांनी शेतीला पाणी देण्या साठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत असे म्हंटले तर ते समजण्या सारखे आहे. पण पाण्या शिवाय शेती होऊ शकत नाही हे नेत्यांना समजलेच नाही?  हे काय भलतेच ?

या संमेलनातील विचारमंथनातून शेतीचे विदारक दृष्य बदलून त्याऐवजी शेतीस
नवसंजीवणी देणारे नवलेखक निर्माण व्हावेत असा आशावाद वक्त्यांनी व्यक्त
केला.
शेतीला नवसंजीवनीची आवश्यकता आहेच. पण ती साहित्यातून येणार? मग उद्योग क्षेत्रात पण मरगळ आहे, सार्वजनिक आरोग्याचा पार बोजवारा उडालेला आहे, शिक्षण म्हणजे तर एक विनोदच झाला आहे, राज्य पार कर्जबाजारी झालेले आहे, . . . या सर्वांवर उतारा साहित्यिक लोक साहित्यातून देणार ?   आणि त्या करता उद्योग साहित्य सम्मेलन, आरोग्य  साहित्य सम्मेलन, शिक्षण साहित्य सम्मेलन, अर्थिक व्यवस्थापन साहित्य सम्मेलन, . . . अशी अनेक साहित्य सम्मेलने भरवावी लागणार ?
 
साहित्याचे आपल्या जीवनात नेमके स्थान काय जरा या बाबत हे  जरा "अती" झाले नाही ?