एक प्रस्तावना आणि दोन टीपा

     पी.जी.वुडहाउस म्हटल्यावर आठवतो तो त्यांचा नायक बर्टी म्हणजेच बरट्रॅम वूस्टर आणि त्याचा खाजगी सेवक म्हणजे बटलर जीव्ह्ज..बर्टीने काही घोटाळे करून ठेवायचे व ते जीव्ह्जने निस्तरायचे हा त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्यांचा गाभा ! अर्थात या दोन पात्रांशिवायतही अनेक कथा व कादंबऱ्या वुडहाउस यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांची संख्या ३५ असावी.
   वुडहाउस यांनी प्रत्येक पुस्तकाला प्रस्तावना लिहिल्या आहेत की हे मला नाहीत माहीत नाही.कारण कादंबरी या वाङ्मय प्रकारास प्रस्तावना लिहिण्याची फारशी पद्धत नाही.अर्थात मराठीत वि.स.खांडेकरांसारखे सन्मानीय अपवाद त्याला आहेतच.त्यांच्या कादंब्रयांच्या प्रस्तावनाही अभ्यासपूर्ण असायच्या. इंग्रजीत त्याबद्दल बर्नॉर्ड शॉ प्रसिद्ध आहे.
   मी वाचलेल्या वुडहाउस यांच्या कादंबऱ्यांपैकी "Something Fresh " किंवा अमेरिकेत "Something New " या शीर्षकासह प्रकाशित झालेल्या कादंबरीला प्रस्तावना आहे आणि वुडहाउस यांच्या पुस्तकांप्रमाणेच तीही अतिशय विनोदी आहे तिचाच अनुवाद माझ्या कुवतीनुसार जसा जमला तसा येथे देत आहे.
   " त्रेपन्न वर्षापूर्वी हे पुस्तक जेव्हां प्रकाशित झाले,तेव्हां अमेरिकेत -- जिथे माझे वास्तव्य १९०९ या वर्षापासून आहे—लेखकांचे वर्गीकरण दोन प्रकारात होत असे बडे लेखक (Swells} ज्यांचं साहित्य नियमितपणे Saturday Evening Post मध्ये प्रकाशित होत असे आणि दुसरे किरकोळ साहित्यिक (Can nail or Dregs) ज्यांची एकादी कथा इतर प्रसिद्ध अथवा मसाला (Pulp) मासिकातून थोड्याबहुत मोबदल्यासह प्रकाशित झाली तर ते स्वत:स नशीबवान समजत. "Something Fresh " मधील पहिले वाक्य लिहिण्यापूर्वी माझी गणना या दुसऱ्या प्रकारात होत असे."    " "मधल्या काळात मी जिच्या लग्नाच्या बेडीत अडकलॉ (आणि तेव्हांपासून अजूनपर्यंत आहे) त्या मानवी स्वरूपातील परीजवळ त्यावेळी पंचाहत्तर डॉलर्स होते.मी स्वतही पन्नास डॉलर्स वाचवण्यात यशस्वी झालेलो असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या आम्ही अगदी सुस्थितीत होतो म्हटले पाहिजे पण तरीही अजून थोडे पैसे आपल्याजवळ असावेत असे आम्हाला वाटे आणि आश्चर्य म्हणजे तसे होण्याचा चमत्कार घडला.
    माझा साहित्य-मध्यस्थ ज्याचा स्वभाव आशावादी असण्याचा कळसच म्हणावा लागेल त्याने माझी कादंबरी Saturday Evening Post "कडे पाठवली    आणि पोस्टचा जगप्रसिद्ध संपादक जॉर्ज होरॅस लोरिमर याने मालिकेच्या स्वरुपात प्रकाशित केली आणि त्यासाठी ३५०० पौंड एवढा भरभक्कम मोबदला देऊ केला त्यामुळे मी अगदी भांबावूनच गेलो.आत्तापर्यंत जगात ३५०० पौंड अशी रक्कम असावी अशी अंधूक कल्पना मला होती पण ती आपल्या हाती येईल अशी मात्र कधी अपेक्षा केली नव्हती.कारण १०० पौंडापेक्षा थोडी अधिक रक्कम म्हणजे फारच झाले अशी त्यावेळी माझी कल्पना होती."! **
    " पण मला नेहमी असे वाटत आले आहे की त्यावेळी माझ्या कादंबरीचे पहिले पान पाहूनच लोरिमरला हे साहित्य स्वीकारायला हवे असे वाटले असावे.माझ्या मसाला मासिकात छापण्यात आलेल्या कथा "P.G.Wodehouse" या नावाखाली प्रकाशित झाल्या होत्या पण या कादंबरीवर मात्र मी लेखकाचे संपूर्ण नाव म्हणजे "PELHAM GRENVILLE WODEHAUSE" असे टाकले होते आणि मला खात्री आहे की  तेच एक कारण असणार की ज्यामुळे माझी कादंबरी लॉरिमरने स्वीकारली. "
   "त्यावेळी अमेरिकेत अश्या तीन पूर्ण शब्दांच्या नावाशिवाय लेखक म्हणून वावरणे म्हणजे अगदी विवस्त्रावस्थेत वावरणे अशी समजूत तेथील साहित्यविश्वात होती.ते दिवस होते,"रिचर्ड हार्डिंग डेव्हिस":जेम्स वॉर्नर बेल्ला""मार्गारेट कल्किन बॅनिन्ग""अर्ल डेल बिगर्स""चार्ल्स फ्रान्सिस को""नोर्मन रीली रेने ""मेरी रॉबर्ट राइनहार्ट"क्लारेन्स बडिन्ग्टन केलॅन्ड" "ओरिसन स्वेटे—अगदी खरे सांगतो मुळीच अतिशयोक्ति नाही—मार्डेन " त्यामुळे त्या प्रथेपासून फटकून वागणे "पेल्हॅम ग्रेनविले वुडहाउस " ला शक्यच नव्हते."
    मला अगदी खरे खरे विचाराल की ’पेल्हॅम ग्रेनविले ’ हे नाव मला आवडते का तर मला कबूल करावे लागेल की मला ते मुळीच आवडत नाही.त्या नावाच्या उच्चाराने माझी मानसिक स्थिति अगदी अंधारल्यासारखी होते.पाद्र्याने जेव्हां ते प्रथम उच्चारले तेव्हां भोकाड पसरून मी त्याचा तीव्र निषेध करण्याचा प्रयत्नही केला होता.पण माझ्या निषेधाचा मुळीच विचार न करता माझ्या रडण्याचा सूर थोडा कमी होताच ’ तुझे नाव पेल्हॅम ग्रेनविले असे मी सांगतो " असे जाहीर करून तो मोकळाही झाला."   
   खरे तर माझ्या नामकरणास माझ्या आजोबांचे नावही तेच असणे हे एक कारण होते.(आपल्याकडेही ही प्रथा आहेच—आता होती म्हणावे लागेल--कुशाग्र )आणि आता त्याचा एकमेव पुरावा म्हणून ते नाव कोरलेला चांदीचा पेलाही १८९७ मध्येच मी हरवून टाकला आहे.पण त्यावेळी मात्र मला पुसटशीही कल्पना नव्हती की हे भयानक नावच चौतीस वर्षानंतर मला असे लाभदायक ठरेल."
   प्रस्तावनेचा यापुढील भाग कादंबरीतील पात्रे व घटनास्थलासंबंधी आहे त्यामुळे कादंबरी वाचल्यावरच तो भाग वाचणे अपेक्षित आहे.  
टीपा :
 *( थोडेसे याच स्वरूपाचे उद्गार "ललित" मध्ये "गोमागणेश" या नावाने प्रकाशित झालेल्या "शरदाचे चांदणे "या लेखात "दिवाळी अंक आणि आम्ही " या शीर्षकाखाली रमेश मंत्री, जयवंत दळवी व ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या माधव मनोहरांनी घेतलेल्या कथित मुलाखतीत खालीलप्रमाणे आलेले दिसतात)
माधव मनोहर : नाडकर्णी,तुमचं मेजर वर्क या वर्षी कुठे वाचायचं ?
नाडकर्णी : कुठंही नाही
मा.मा.: वॉट डु यू मीन ?
--------------
-------------
नाडकर्णी : सत्यकथा बंद झाल्यावर माझा उत्साहच संपला ! एकाद्या फडतूस संपादकानं कथा स्वीकारण्यापेक्षा राम पटवर्धनां(सत्यकथाचे संपादक) नी ती नाकारणं मला अधिक अर्थपूर्ण वाटतं.माझ्या मते मराठीत दोनच प्रकारचे लेखक आहेत --- सत्यकथेचे लेखक आणि वरकड लेखक जे पुष्कळसे फालतू असतात.)
     
** ( हे वाचल्यावर मला एकदम आठवण झाली ती मराठीतील जुन्या पिढीतील लेखक ना.धों.ताम्हणकर यांची.(हो तेच गोट्या चे लेखक) त्यांच्या  "किर्लोस्कर"मधून प्रसिद्ध झालेल्या "दाजी" या मालिकेवर चित्रपट काढण्याचा प्रस्ताव घेऊन मास्टर विनायक त्यांच्याकडे गेले.ताम्हणकरांना याची अगोदर थोडीशी कुणकुण लागलेली होती.त्यांना त्यांच्या मित्रांनी पढवून ठेवले होते की हे चित्रपटधंद्यातील लोक तुम्हाला बनवतील तेव्हां पाचशे रुपयाहूब एक पै सुद्धा कमी मागू नका.(ही १९४८-५० मधील गोष्ट )त्यामुळे मा.विनायक आल्यावर व त्यानी तो विषय काढल्यावर त्यांच्या प्रस्तावाचा स्वीकार ताम्हणकरांनी केलाच पण लगेच "हो पण तुम्हाला अगोदरच सांगून ठेवतो की पाचशे रुपयाखाली एक पै देखील घेणार नाही. मला माहीत आहे तुम्ही चित्रपटक्षेत्रातले लोक आम्हा लेखकांना अगदी बावळट समजता " मा.विनायक "अहो नाना माझे ऐकून तरी घ्या " असे म्हणू लागले पण नाना त्यांचा एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नाहीत.एवढे झाले की शेवटी नानांनी मा.विनायकांना पाचशे रुपायांचा चेक फाडायलाच लावला.शेवटी उठून निरोप घेता घेता मा.विनायक म्हणाले,"अहो नाना या कथेबद्दल तुम्हाला तीन हजार रु.द्यायचे ठरवून आम्ही आलो होतो." पी.जी.वुडहाउस हे अगोदर मोबदला ठरवायला गेले असते तर अशीच काहीशी परिस्थिती झाली असती. त्यामुळे मराठी लेखकाच्या अपेक्षेची धाव कुठपर्यंत असे हिणवायचे कारण नाही.अर्थात आता तशी परिस्थिती उरली आहे की नाही ? मराठी लेखकच जाणोत  असो ! )