ज्ञानयात्रा

प्रवास मनापासून करायला आवडतो कुठेही, कसाही, केव्हाही, कितीही! त्यामुळे प्रवास वर्णनेही खूप वाचली जातात. असाच मायबोलीवरचा ( दुवा क्र. १
) हा लेख वाचनात आला अन विचारचक्र सुरू झालं. टू बी ऑर नॉट टू बी! एक
खूप आवडीच वाक्य आहे 'वी डोंट नो व्हॉट वुई कॅन डू टिल वुई ट्राय
इट'.... आणि एक दिवस नोंदणी करून टाकली. हुश्श! पाठ्यपुस्तकातील
विज्ञानाशी संबंध सुटून अनेक दशकं उलटली.. हे जरी खरं असलं तरी वैज्ञानिक
दृष्टिकोन, तार्किकता, जिज्ञासू वृत्ती व कारणमीमांसा असे मूळ व मुख्य
घटक असले तर प्राथमिक विज्ञान कोणालाही शिकवता येऊ शकतं, हे आज
आत्मविश्वासाने सांगू शकते. ह्या मूळ घटकांवरची धूळ झटकण्याचं काम केलं
ग्यानसेतूचे प्रशिक्षक सुजयसर, चैतन्य अन प्रवीण ह्यांनी व त्याला
चमकवण्याचं काम केलं निकीता, अर्पिता, अनन्या व रुक्मिणी ह्या तरुणींनी!
ह्या सगळ्या चमूला त्रिवार धन्यवाद!

ज्ञानप्रबोधिनीत पंचवीस-सव्वीस मार्चला प्रशिक्षण कार्यशाळेत प्रवेश
केला दबकत दबकतच! शाळा म्हणजे वयस्कर (वयाने मोठे) मास्तर अन लहान
विद्यार्थी असं सर्वसाधारण समीकरण नव्हतं पण अर्थात ज्ञानाने मास्तर
निर्विवाद ज्येष्ठ होते. अरविंद गुप्तांच्या छोट्या छोट्या प्रयोगातून,
खेळण्यांमधून संकल्पना स्पष्ट करणं, जिज्ञासू व निरीक्षण वृत्ती जागृत
करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू. उल्हसित वातावरणात गाणी, गोष्टी, खेळ,
ओरिगामी, प्रात्यक्षिकं करण्यात दोन दिवस कसे गेले ते कळलेच नाही.
अशीच आमुची शाळा असती, असेच आमुचे शिक्षक असते... 'आम्ही' कसे घडलो असतो
विचार करू लागले... असो! आज स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली पण भारताच्या
काही दुर्गम भागात ना अश्या शाळा आहेत ना असे शिक्षक. पण
'ग्यानसेतू'च्या ह्या उपक्रमाद्वारे काही प्रमाणात ती उणीव भरून काढायला
मदत तर करू शकतो ना!
चौदा मेला आम्ही पाचजणी विमानाने गवाहाट्टीला संध्याकाळी पोचलो व तिथून
रात्री आठ वाजताच्या भारतीय रेलने तिनसुखियाला निघालो. चार वाजता लख्ख
उजाडलेलं होतं... पाऊस पडत होता.. दुतर्फा हिरवेगार चहाचे मळेच मळे...
नुकतीच न्हाऊन निघालेली ओलेती हिरवीकंच धरती... नयनरम्य मन प्रसन्न
करणारी पहाट! तिनसुखियाला यजमान 'लोमी' घ्यायला आली होती. आसामामध्ये बंद
पुकारल्या कारणाने पुढे रोईंगला जाणे धोक्याचे होते. एक दिवस हॉटेलात
मुक्काम करावा लागला. दुसर्या दिवशी पहाटे साडेपाचच्या बसने रोईंगला
निघालो. तिनसुखिया ते रोईंग साधारण १०० किमी पण प्रवास ५ -६ तासाचा.
उबडखाबड रस्त्यावरून काही अंतर गेलो की उतरायचं, नावेत बसून ब्रम्होपुत्रो
पार करायची व पलिकडल्या तीरावर बस पकडायची व रोईंग गाठायचे. आपल्या संथ
वाहणार्याा कृष्णामाई सारखीच ही संथ ब्रह्मपुत्रा.

7123957935_9631955225_m.jpg

छत्री सांभाळत ब्रह्मपुत्रेचा अजस्त्र रूप न्याहाळत दोन तासाचा प्रवास
कधी संपला कळलंच नाही. रोईंगहून जायचं/यायचं असेल तर हा प्रवास अपरिहार्य!
एक दिवस अश्या प्रवासाचा आनंद घेऊ शकतो पण नेहमी... अर्थात मुंबईत आल्यावर
ही लोकं असंच म्हणतील एवढ्या गर्दीत, गर्मीत कसे काय बुवा प्रवास करतात.
असो! बम्हपुत्रेला पूर ही नित्याचीच बाब त्यामुळे पावसाळ्यात हा प्रदेश
संपर्कहीन असतो. दिबांग खोरेवासी पुलबांधणी पूर्ण होण्याची आतुरतेने वाट
बघताहेत. पुल झाल्यावर आर्थिक, सामाजिक, राजकीय गणितं मोठ्या प्रमाणात
नक्कीच बदलतील. पलिकडल्या तीरावर बसमध्ये बसलो. आसाम व अरुणाचलच्या
सीमेवर आयएलपी घेतल्याशिवाय प्रवेश करता येत नाही.
7123957935_9631955225_m.jpg
ओळखपत्रासह रांगेत उभे राहिलो. संगणकाच्या युगात आजही अस्तित्वात असलेला टाईपरायटर व होल्डॉल बघून गंमत वाटली.
7123957935_9631955225_m.jpg
लग्नाच्या आहेरात मिळालेला होल्डॉल आठवला.
7123957935_9631955225_m.jpg

हिरवीगार कुरणं, सुपारीची झाडं, केळ्यांची बनं, जंगली अळू, अळूचे मळे व
बांबूची घरे बघायला मजा येत होती. वाहक काडीसदृश काहीतरी चघळत होता....
ज्येष्ठमध वाटत होते... कुतूहल स्वस्थ बसू देत नव्हतं. त्याला विचारले
तर तो म्हणाला ज्येष्ठमधाची काडी! आम्हालाही खायला दिली अन त्याचे औषधी
गुण सांगू लागला पेट, खांसी हे लिये अच्छी होती है... उपर पहाडोंपर बहोत
होती है! आपल्या इथल्या कुटलेल्या गोड सुपारीतले मूळ घटक सुपारी,
ज्येष्ठमध शेकडो मैलो दूरच्या राज्यात पिकते, आश्चर्य वाटले. वाहक बोलका
होता. बसची पायरी अगदी उंच! मलाच चढउतार करताना त्रास होत होता लठ्ठ
लोकं दिसली तर नाही पण म्हातार्यांाना किती त्रास होत असेल? एक स्टूल
ठेवायला पाहीजे ना... न राहवून तसे सुचवलेच. उत्तर ऐकून गहिवरूनच आले.
माणुसकी ब्रम्हपुत्रे इतकीच इथे दुथडी भरून वाहतेय... अतिवृष्टीच्या ह्या
राज्यांमध्ये बसमध्ये पाणी शिरू नये म्हणून पायरी उंच असते व स्टूल
किसलिये? हम है ना मदत करने के लिए...... आपण स्टुलाचाच विचार करणारी
माणसं!

लोअर दिबांग व्हॅलीचं जिल्ह्याचं ठिकाण 'रोईंग'. छोटंसं गांव! आमची
व्यवस्था 'इनतया' शाळेच्या वसतिगृहात करण्यात आली होती. मुलांना सुट्या
असल्यामुळे आपआपल्या घरी गेली होती. हसमुख ज्योतीदिदी (शाळेच्या संचालिका)
स्वागताला हजर होत्या. ज्योती, लोमी भगिनी पूर्वपरिचीत असल्यासारख्या वागत,
वाटत होत्या. दोघींचाही सेन्स ऑफ ह्यूमर जबरदस्त त्यामुळे संकोचाला थाराच
नव्हता. चहा नाश्ता करे पर्यंत पावसाने विश्रांती घ्यायचं ठरवलं व आम्ही
संधीचा फायदा! शाळेत ऐकू येणारा नदीचा खळखळाट प्रत्यक्ष बघायला बाहेर
पडलो. देवपानी (इजे) व इमेचा संगम! पाऊस पडल्यामुळे दोन्ही नद्या
खळाळून वाहत होत्या. बम्हपुत्रा व तिच्या उपनद्या पात्र बदलतात, हे ऐकून
होतो. तिथल्या दीड दोन तासाच्या वास्तव्यात प्रत्यक्ष ते दृश्य बघून
चकित झालो. साहसी व उत्साही चारचौघी वीरबालांनी झुलत्या पुलावर चालण्याचा
रोमांचकारी अनुभव घेण्याची संधी सोडली नाही.

7123957935_9631955225_m.jpg

कुठेही नजर टाका 'इतना बडा पहाड, पहाड पर पेड और.. और हरियाली इधर उधर,
हरियाली इधर उधर' ज्ञान प्रबोधिनीत शिकवलेलं गाणं... प्रत्यक्ष अनुभवत
होतो.
7123957935_9631955225_m.jpg

अरुणोदयाचा प्रदेश म्हणून अरुणाचल प्रदेश. सूर्योदय पहाटे चारला व
संध्याकाळी पाच वाजता अंधारायला सुरुवात व्हायची. दुसर्याप दिवशीच्या
कार्यशाळेची तयारी करायची होती. काही अतिउत्साही मुली आदल्या दिवशीच
मुक्कामाला आल्या होत्या. त्यांच्याशी गप्पा मारत, सहभागी करून घेत
कार्यशाळेची तयारी करू लागलो.
क्रमशः