सापडला म्हणूनच ----

      ( साने यांच्या घराण्यात कोणी तबल्याला हात  लावलेला नसताना एकदम केवळ घरात माळ्यावर तबला सापडला म्हणून तबला शिकण्याची त्यांनी व्यक्त केलेली इच्छा मला कशी पुरी करावी लागली याचा इतिहास " सापडला म्हणून "या माझ्या लेखात (मनोगत ४/४/२०१३)मी वर्णन केला आहे. ) 
        आम्ही जागा बदलली हे कारण झाले आणि परस्पर संबंध न बिघडता माझी त्या शिकवणी शिक्षेतून (शिक्षणास हिंदी भाषेत शिक्षा का म्हणतात ते कळले) सुटका झाली. पुढे कधीही सान्यांकडे गेल्यावर मी भीत भीत तबल्याचा विषय काढला की "नाही हो आता जमतच नाही,? असा खेदपूर्वक उदगार ते काढत आणि पुढे " तो काय अनायासे  घरात सापडला आणि उगीचच पडून  राहून वाया चालला होता म्हणून वाटत होतं वाजवावे " असा शेवटही  करत.  तसे मला आता भीत भीत विचारण्याचे कारण नव्हते कारण आता साने तबला वाजवण्याचे नाव काढतील अशी शक्यता नव्हती पण मी तबला या विषयाला ( तबल्याला नव्हे) उगीचच हात घालून सान्यांच्या नाजुक भावना दुखावतो असा साधनाचा (गैर)समज !  पण तरीही  मी त्यांच्या नकारामुळे अधिकच प्रोत्साहित होऊन त्यांना ," हे काही बरोबर नाही इतका सराव केलाय तसे  मधून मधून वाजवत जा" असा निरर्थक सल्ला देण्याचा प्रयत्न करत असे पण  साधना मात्र त्यावर "आता कसले वाजवतात ते, तू भेटलास म्हणून इतका तरी त्या तबल्याला उजेड दिसला " असे बोलून  त्यांचा खऱ्याखऱ्या भावना व्यक्त करत असे. सान्यांनी तबला शिकायला सुरवात केली व नंतर आता  त्यांच्या शिक्षणावर पडदाही  पडला हे जाणणाऱ्या माझ्या काही संगीतप्रेमी मित्रानी मधून मधून त्यानी   तबला कोणालातरी विकावा अशी आडून आडून  सूचनाही केली  आणि साधनाताईनी त्याला दुजोराही दिला त्यावर  मात्र एकदम उसळून सान्यांनी  एकदम "तसं काही समजू  नकोस बर का एकादेवेळ मला  पुन्हा तबला वाजवावा वाटला तर मी काय परत विकत घेऊ? " असा तिला दम दिला ,या दोन्ही गोष्टीत (म्हणजे त्यांना तबला वाजवावा  वाटणे आणि त्याहीपेक्षा  त्यानी तो विकत घेणे)  काहीच दम नव्हता हे आम्हा सगळ्यांनाच कळले होते त्यामुळे  सान्यांचा तबला हा असा सगळ्यांच्या दृष्टीने एक विनोदाचा विषय झाला होता, 
       पण एका दिवशी या विनोदी विषयाचा कायमचा  निकाल लावून टाकण्याचा विचार सान्यांनीच  केलेला दिसला कारण त्यांच्याकडे गेल्यावर सर्वसाधारण गप्पा झाल्यावर त्यांनी एकदम "अहो तुमच्या ओळखीत कुणाला तबला हवा आहे का ?" असे विचारले।आणि मी काही उत्तर देण्यापूर्वीच "आता हा तबला विकूनच टाकावा म्हणतो " असा आपला मनोदयही व्यक्त केला. त्यांचा तो विचार योग्यच आहे असे मलाही वाटत होते.  पण त्याचबरोबर तबल्याला गिऱ्हाईक शोधणे  हा माझ्या अखत्यारीतला विषय नव्हता हेही  माहीत होते,  तरी "ठीक आहे,विचारुन बघतो " असे नेहमीच्या पठडीतले उत्तर दिले.  या उत्तराचा अर्थ ज्याला हवा तसा घेता येतो, तसा  सान्यांनी त्यांना हवा तसा म्हणजे होकारार्थी घेतला तर मी त्याचा अर्थ मला हवा तसा घेऊन स्वस्थ बसलो. पण पुन्हा त्यांची गाठ पडल्यावर हां विषय निघाला की मला उत्तर देणे अवघड जाऊ  लागले . तबला विकण्याची सूचना देणारे मित्र आता एकदम चुप झाले होते कारण नुसता सल्ला देणे वेगळे आणि प्रत्यक्ष अश्या अवघड व्यापारात भाग घेणे वेगळे त्यामुळे मी त्याबाबतीत तद्न्य व्यक्तीला म्हणजे अर्थातच सौ.ला पुढे करून  माझे काम हलके म्हणजे जवळ जवळ नाहीसेच केले आणि ती  जणू तिचीच जबाबदारी झाली आणि तिच्या शोधक नजरेने  ज्यांची नातवंडे  तबला शिकण्याचा प्रयत्न करत आहेत अश्या काही आज्या किंवा अश्या मुलांचे आईबाप यांच्याकडे वळली। 
     योगायोगाने आमच्याच सोसायटीत असे काही लोक तिला आढळले आणि लगेच तिने त्यांच्याशी बोलणीही   सुरु केली . पण पुणेरी आईबाप आपल्या मुलाला तबला शिकवण्यास पाठवत असले  तरी त्याला तबला येईल अशी खात्री पटेपर्यंत तबला विकत घेण्यासाठी काही हजार किंवा सान्यांचा  जुना असल्यामुळे काहीशे रुपये खर्च करण्यास तयार नसल्याचे तिला आढळून आले.खुद्द सान्यांच्याच घरात तबला असून नातवंडे त्याला हात  लावू इच्छित नव्हती.(आमच्याकडेही तरी काय तसेच )त्यामुळे तबला विकला जाणे  ही गोष्ट तशी अशक्य कोटीतील नसली तरी अवघडच होती . एवढेच की हे  सान्यांच्या कानावर घालून त्यांच्या तबल्याच्या विक्रीत माझा सक्रीय सहभाग आहे हे मात्र मी ताबडतोब सिद्ध केले. त्यासाठी आंतरजालावर किंवा पेपरमध्ये जाहिरात द्यावी असेही सुचवून पाहिले. पण आंतरजालाविषयी सान्याना मुळीच आपुलकी नव्हती तर न खपणाऱ्या तबल्यासाठी जाहिरातीचा उपद्व्याप व खर्च करण्याची त्यांची इच्छा नव्हती. आणि त्यांच्या तबल्यावरील धूळ पुसून साधनाताई मात्र टेकीस येत होती. शेवटी एक दिवस तिच्या तक्रारीला कंटाळूनच की काय कोण जाणे पण साने मला म्हणाले," तबला तसाच कोणी नेत  असेल तरी हरकत नाही , पहा बर कुणाला हवा आहे का ?"
    या त्यांच्या आवाहनाला मात्र काही तबला शिकाऊ बालकांचे पालक प्रतिसाद देण्याची शक्यता आमच्या खरेदी विक्री तद्न्य सौ. ने तत्काळ व्यक्त केली  आणि असे काही पालक असल्याची बातमी मी श्री, साने यांना सांगितली तेव्हां मात्र त्यांनी " मग त्याना ताबडतोब तबला घेऊन जायला सांगा " असे मला सांगितले, बहुधा तबल्यावरील धूळ साफ करण्याची जबाबदारी आता साधनाताईनी त्यांच्यावर सोपवली असावी .  
    तबला शिकाऊ बालके आमच्या परिचयाच्या दोन घरात होती त्या दोन्ही पालकांना साने यांची ही ऑफर आमच्या सौ, ने देऊन "तबला थोड़ाफार दुरुस्त करून  घ्यावा लागेल " ही पूर्वकल्पनाही दिली, त्याचबरोबर सान्यांना फोन करून येऊ शकणाऱ्या त्यांच्या तबलासंकट विमोचकांची माहिती देऊन ठेवली त्यांनीही फोन करून जावे  यासाठी श्री, साने यांचा फोन नंबर त्यानाही  दिला,  आमच्याच इमारतीत वरच्या मजल्यावरील देशपांडे यांनीच पहिला नंबर लावला सुदैवाने त्यांनी फोन केला व साने घरातच होते. त्यांची मुलाखत होऊन लगेच देशपांडे पति पत्नी त्यांचा तबला घेऊन आले व दुरुस्त करून त्यांचा मुलगा प्रॅक्टीस करूही  लागला व आमच्या मध्यस्थीने दोन कुटुंबांची गरज भागली याचा आनंदही आम्हाला मिळाला,आता तबलाप्रकरणाचा शेवट झाला अश्या समाधानात आम्ही विशेषत: मी होतो पण तसे होणार नव्हते. 
     मी जरी सान्यांच्या घरापासून ज़रा अधिक दूर राहायला लागलो असलो तरी मधून मधून सदिच्छाभेटी होतच असत तसा  एक दिवशी साधनाचा फोन आला व आम्हाला घरी येण्याचे तिने निमंत्रण दिले पण आम्हाला शक्य नसल्यामुळे त्यांनीच यावे असे फोनवरून मी सुचवले. तसे त्यांनी मान्य केले व संध्याकाळी दोघेही आले. गप्पा खाणेपिणे झाले. निघायच्या सुमारास साने विचारते झाले "ते देशपांडे तुमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात ना ?" "हो,का?" मी विचारले तबलाध्याय आता पुरा झालाय अश्या समजुतीत मी असल्यामुळे मला या चौकशीचे कारण कऴेना. "काही नाही त्यादिवशी तबला न्यायला आले तेव्हां मी फारसा बोललो नाही आणि मुलगा प्रॅक्टीस करायला लागला का, तबला कसा काय वाटला अशी सहज चौकशी करायची होती "साने उत्तरले. त्यांच्या या विचारपूस करण्यामागील भावना मी समजू शकत होतो त्यामुळे मी त्यांना ताबडतोब देशपांडे यांच्याकडे नेण्याची तयारी दाखवली पण सौ. च्या नेहमीच्या जागरुकतेनुसार तिने देशपांडे यांच्याकडे फोन लावला व देशपांड्यांची सून तिच्या मुलाला घेऊन तबल्याच्या क्लासलाच निघाली होती असे कळल्यावर जरी साने यांनी पांच मिनिटांत भेटून घेऊ म्हटले व तशी सुनेने थांबण्याची तयारी दाखवली तरी इतक्या घाईघाईने जाण्याची आवश्यकता नाही असे साधनाचे मत पडले व श्री.साने यांनाही ते पटल्यासारखे दिसले. त्यामुळे आम्ही त्यांना सोडायला बाहर पडलो बाहेर पडल्यावरही "देशपांडे यांचा मुलगा तबला वाजवतो ना ?त्यांना तबला आवडला ना?"अशी चौकशी साने करतच होते. त्यामागील हेतु मात्र माझ्या लक्षात येईना पण मग,"हो हो त्या मुलाचे आजोबा मला दररोज भेटतात व तुमचा तबला मिळाल्यामुळे त्यांच्या नातवाला दररोज प्रॅक्टीस करता यायला लागल्यामुळे ते खूष आहेत "असे सांगून त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. त्यावर "हो पण त्यांचा नंतर काही फोन आला नाही "अशी प्रतिक्रिया त्यांनी त्यांनी व्यक्त केली त्यावरून आपण तबला काहीही न घेता म्हणजे अगदी फुकट देण्याचे औदार्य दाखवले  पण त्याबद्दल  पुरेशी कौतुकाची पावती आपल्याला मिळाली नाही अशी नाराजीची भावना त्यातून व्यक्त झाल्यासारखे वाटले.अर्थात त्याबद्दल मी त्यांचे जरी कितीही कौतुक केले तरी त्यामुळे त्यांचे समाधान होणार नव्हते.पण तरीही  त्यामुळे तबलाप्रकरण फाइल पुन्हा उघडावी लागेल अशी मात्र मला मुळीच शंका आली नाही. 
       पण थोड्याच दिवसात सकाळी कधी  नव्हे  तो सान्यांचा फोन मला आला , तबला शिक्षण बंद झाल्यावर त्यांचा फोन मला येत नसे आणि त्यापूर्वीही तबलाविषयक असेल तरच त्यांचा येत असे एरवी साधनाच कधी  येणार असेल व काही निमंत्रण द्यायचे असेल तर फोन करत असे,त्यामुळे त्यांचा फोन आला म्हणून मला आश्चर्य वाटलेच पण त्याहीपेक्षा आश्चर्य वाटले ते त्यांचे फोनवरील उदगार ऐकून कारण ते म्हणाले,"अहो देशपांड्यांनी तबला परत केलाच नाही" आता या प्रकरणातून मला अंग काढून घ्यायचे होते (आणि तसा  बऱ्यापैकी मी निसटलोही होतो) पण तरी माझ्या स्वभावानुसार 
" अहो पण तुम्ही त्यांना तो त्यांच्या मुलांसाठी कायमचा दिला होता ना ?"असे विचारल्यावर ते म्हणाले, 
" तसं काही नाही नाही . त्यादिवशी ते आले त्यावेळी मला न विचारताच हिनं देऊन टाकला आणि थोड्या दिवसांसाठी नेतो असे ते म्हणाले होते, असं मला वाटत होतं "  
"पण आता तुम्हाला कशाला पाहिजे ?" यावर सान्यांचे उत्तर ऐकून मी आश्चर्याने बेशुद्धच पडण्याच्या बेतात होतो.कारण ते म्हणाले ,"मी ज़रा पुन्हा प्रैक्टिस करावी म्हणतोय"
त्याना मी काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हतो कारण या सगळ्या प्रकरणात माझी भूमिका काय होती हे माझे मलाच कऴेनासे झाले ,फक्त मी त्याना एवढेच सांगितले "मी तुम्हाला देशपांडे यांचा फोन नंबर देतो तुम्हीच  काय ते बोला. "
       त्यानंतर मी साधनाला फोन करून  विचारले "देशपांडे यांना तुम्ही तबला परत करण्याच्या बोलीवर दिला होता का?"
"नाही" तिने उत्तर दिले व पुढे तीच म्हणाली "का कश्यासाठी विचारतोस?" त्यावर मी तिला तिच्या यजमानांचा फोन आला होता व ते पुन्हा प्रॅक्टीस सुरु करताहेत असे सांगितले त्यावर तिने,
"त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नकोस . ते काही प्रॅक्टीस वगैरे करणार नाहीत. देशपांडे याना तबला परत करायचे कारण नाही "असे सांगितल्यावर मी निश्चिन्त झालो. 
         पण त्यानंतर काही दिवसानी साने यांचा पुन्हा फोन आला.साने यांचा फोन म्हटल्यावर मला उगाचच चिंता वाटू लागली .पण सहज भेटायला दोघेही येतो म्हटल्यावर आम्ही त्यांच्या स्वागताची तयारी करून वाट पहात  बसलो आणि मग नियोजित वेळी ते आलेही नेहमीसारख्या गप्पा वगैरे झाल्या आणि ते जायला उठले आणि निघता निघता अचानक आठवण  झाल्यासारखे म्हणाले ,"ते देशपांडे कोणत्या बिल्डिंगमध्ये 
आहेत ?" साने आता वयोमानपरत्वे काही गोष्टी विसरु लागले होते। पहिल्या तबलावादन पाठासाठी ते आमच्या पूर्वीच्या घरात भलत्याच बिल्डिंगमध्ये घुसले होते तसेच आताही देशपांडे  आमच्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावरच राहतात हे ते विसरले होते ,  मी त्यांना देशपांडे आमच्याच इमारतीत राहतात या  गोष्टीची आठवण करून  दिली व त्याचबरोबर ते गावाला गेले आहेत हेही सांगितले. त्यावर 
"तरीच मी फोन केला तरी कोणी उचलत नव्हते " असे त्यांनी  सांगितल्यावर आम्हा दोघांनाही (साधनाचे काही माहीत नाही) आश्चर्य वाटले व मी त्यांना विचारले 
"आता फोन कश्यासाठी ?"
"अहो त्यांनी तबला परत आणून दिला नाही म्हणून त्यांना आठवण करून  द्यायची होती "
"पण तबला तर तुम्ही त्याना कायमचा दिला,त्यांनी तो दुरुस्तही  करून  घेतला असे साधना सांगत होती " असे मी त्याना ऐकवल्यावर त्यांनी तिच्याकडे वळून  " असे तू सांगितलेस ? कमाल आहे मला वाजवायला पाहिजे हे तुला माहीत आहे ना ?" असे अगदी उच्च स्वरात विचारले . नेहमी (इतर  सर्व नवऱ्यांप्रमाणे )साधनाच्या अगदी अर्ध्या वचनात असणारे साने  एवढा आवाज चढवून बोलताना आम्ही प्रथमच पहात असल्यामुळे त्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करावी हे आम्हाला समजेना.  पण साधनालाही त्यांच्यात काहीतरी मानसिक बदल झाल्याचे जाणवले आणि नेहमीप्रमाणे त्यांना न दटावता  आवाज आणखीच मृदु करून " अहो पण तो सांगतोयना की ते गावाला गेलेत म्हणून "असे म्हणून निघण्याची तयारी  दाखवली व निघता निघता ," ते आता काही तबला वाजवणार नाहीत " असे मला सांगू लागली .            
       त्यांना रस्त्यापर्यंत सोडण्यासाठी आम्ही दोघेही बाहेर पडलो तेव्हांही आपण पुन्हा तबला वाजवणार आणि कोणते ताल कसे वाजवणार हेही साने मला सांगू लागले इतका तबल्यात त्याना रस उत्पन्न झालेला मी प्रथमच पहात  होतो.    रस्त्यावर त्याना सोडतानाही त्यांनी पुन्हा पुन्हा देशपांडे यांना आठवण  करून देण्याविषयी बजावले व मी त्यांच्या समाधानासाठी त्यांना पुन्हा पुन्हा होकार देत  गेलो.त्याना सोडून परत येताना सौ. मला म्हणाली "साने बहुधा तबला घेऊनच जाणार त्याशिवाय त्याना चैन पडणार नाही." मी आचंबितच झालो कारण ती  पुढे म्हणाली ,"त्याना तबला वाजवण्यासाठी नकोच आहे पण त्यांच्या मनात आपला तबला देशपांडे आपल्या मनाविरुद्ध घेऊन गेले ही भावना घर करून  बसली आहे " सौ. ने मानसशास्त्राचा चांगलाच अभ्यास केलेला दिसला. 
"मग आता काय ?" मी हताश होऊन  विचारले,
"आता काय देशपांडे यांना तो परत करावा लागेल " तिने शांतपणे उत्तर दिले. 
तेवढ्यात साधनाचाच फोन आला " कालचे त्यांचे बोलणे  मनावर घेऊ नकोस . तबला देशपांडे याना आम्ही दिलेलाच  आहे. आता तो परत कसा मागणार ? "
    मी सौ.ला विजयी मुद्रेने हे सांगितले तरी तिने आपला अंदाजच बरोबर आहे आणि साने तबला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत असे सांगितले।
"मग तबला परत करायला देशपांडे यांना कोण सांगणार ?" मी विचारले कारण या प्रकरणात आम्ही दोघे निष्कारणच अडकलो होतो  सान्यांचा तबला परत करायला देशपांडे यांना सांगणे मलाही योग्य वाटत नव्हते. 
  एक दोनच दिवसांनी सान्यांचा फोन आलाच. यावेळी त्यांचा सूरही ज़रा वरच्या पट्टीतला होता. 
" कायहो तुम्ही देशपांडे यांचा फोन नंबर दिलेला बरोबर आहे ना ?"
" हो. का ?" मी विचारले  
" नाही ते फोन उचलत नाहीत." मी देशपांडे यांचा फोन नंबर पुन्हा डायरीत पाहून त्यांना वाचून दाखवला. आता साने भलतेच दक्ष झालेले दिसले. कारण मी पाहून नंबर वाचून दाखवल्यावर ते म्हणाले,
"अहो यात तर आठच आकड़े आहेत."
" मग किती हवेत ?" मी ज़रा चिडूनच विचारले. देशपांडे किंवा आम्ही सान्यांचा तबला चोरला असावा व त्या प्रकरणाचा  पोलीस तपास चालू आहे असे स्वरूप आता या सर्व प्रकरणास येऊ लागल्यासारखे वाटू लागले. 
"दहा आकड़े हवेत ना?" साने आपली चिकाटी  न सोडता फोनवर बोलले.
" ते मोबाइल फोननंबरसाठी ,हा लैंड लाइन आहे " मी माझा आवाज खालच्या पातळीत ठेवण्याचा प्रयत्न करत म्हटले. तबल्याच्या विरहामुळे सान्यांचे मनोस्वास्थ्य फारच ढासळल्याचे दिसत होते. 
" मग काय झाले यातही दहा आंकड़े हवेतच की " शेवटी त्याना समजावण्यासाठी मी त्याना म्हणालो ,
"असे काय करता ? आता माझ्याशी तुम्ही लैंड लाइनवर बोलत आहात तर माझ्या या क्रमांकात किती आंकड़े आहेत मोजा बर " त्रितालच्या मात्रा त्याना मोजायला सांगावे तश्या आविर्भावात मी त्याना सांगितल्यावर त्यांनी खरोखरच फोन नंबरमध्ये आठच आकड़े आहेत व पुण्यातील लैंड लाइनवर फोन करताना तेवढेच वापरावे लागतात   हे मान्य केले. त्यानंतर लगेचच त्यांनी तो क्रमांक लावला पण सुदैवाने (किंवा साने यांच्या दुर्दैवाने) देशपांडे घरात नव्हतेच,त्यांच्याकडे आलेल्या वृद्ध पाहुण्या बाईंनी फोन उचलला व ते घरात नाहीत हे सांगितले व ही गोष्ट  ताबडतोब साने यांनी  फोनमधून माझ्या कानावर घातली. 
        आता हे प्रकरण फारच पेटणार असे वाटून मी साधनाला फोन केला .यावेळी तिचा सूर जरा वेगळाच भासला. त्यात चिंतेची झाक दिसत होती.  आत्तापर्यंत तिने मला समजावण्याचा प्रयत्न केला  होता व तबला परत करायचे कारण नाही असे ती सांगत होती , पण बालमानसशास्त्राइतकीच वृद्ध मानसशास्त्रातही तद्न्य सौ. ने मी कोणाबरोबर बोलत आहे हे ताड़ून फोनचा ताबा घेतला,
"हे पहा साधनाताई,तुम्ही देशपांडे यांना स्पष्ट सांगा की साने आता तबला मिळाल्याशिवाय चैन पडू देणार नाहीत. आणि  तो तबला त्याना परत द्यायला सांगा. फार तर त्यासाठी त्यांनी जो काही खर्च केला तोही  द्यायची तयारी दाखवा.नाहीतर देशपांडे आणि तुमची या प्रकरणातून सुटका नाही. " 
" बहुधा तसंच कराव लागेल असं दिसतेय , कारण ते कालपासून माझ्याशी बोलायलाही तयार नाहीत " साधना 
       चार पांच दिवसांनी साधनाचा फोन सौ. ला आला व देशपांडे यांनी तबला परत केला असे आम्हाला कळले.   साने यांनी तबला वाजवायला सुरवात केली की नाही हे समजले नाही. देशपांडे यांना त्यांच्या नातवास तबला सरावासाठी आपला तबला घेऊन जायला सांग असे मी सौ. ला सुचवले व तिने तिच्या सवडीने तसे केलेही. नंतर देशपांडे यांच्या सुनेची  माझी फिरायला जाताना गाठ पडली तेव्हां या तबला प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त करून मी तिला सांगितले ,"आमचा तबला घेऊन जा तुमच्या मुलाला प्रॅक्टीस करायला ,आम्हाला हवा असेल तेव्हां फक्त आणून देत  जा म्हणजे झाले. " त्यावर तिने आभार मानत होकार दिला पण अजून त्यांना तबला न्यायला मुहूर्त मिळाला नाही.  तिच्या  मुलाचाही तबला शिकण्याचा उत्साह तेवढ्यापुरताच होता की काय कोणास ठाऊक. साने यांचा तबला मात्र आनंदाने धूळ  खात पडला आहे.