साहित्यसम्राट

          साहित्यसम्राट हा किताब नरसिंह चिंतामण तथा  तात्यासाहेब केळकर यांच्याबाबतीत वापरला जात असे हे माझ्या पिढीतील म्हणजे आयुष्याचा अधिक भाग विसाव्या शतकात घालवलेल्या मनोगतींना माहीत असणार. तात्यासाहेबांच्या चतुरस्र लेखनामुळॅ त्याना तो मिळाला होता. परंतू त्यात एक त्रुटी होती ती म्हणजे त्यांनी "काव्य" या क्षेत्रात मात्र जवळ जवळ काहीच साहित्यनिर्मिती केल्याचे ऐकिवात नाही. ( निदान मला तरी माहीत नाही.) त्या दृष्टीने साहित्याच्या अगदी प्रत्येक क्षेत्रात भरीव आणि मोलाची कामगिरी बजावल्यामुळे कविवर्य कुसुमाग्रजांना हा सन्मान देणे खरोखरच सयुक्तिक ठरेल. एक डझनाहून अधिक(१८) काव्यसंग्रह, चौदा स्वतंत्र व सहा अनुवादित नाटके, चार कादंबऱ्या , पंधरा कथासंग्रह, सात स्फुटलेखसंग्रह, व अनेक संपादित ग्रंथ अशी साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. याशिवाय वृत्तपत्रक्षेत्रात लेखनास सुरवात करून काही वृत्तपत्रांचे संपादनही काही काळ त्यानी केले होते. त्यांच्या सब्दाचे सामर्थ्य एवढे की त्यांया "गर्जा जयजयकार "या कवितेने स्वातंत्यापूर्वीच्या पिढीतील प्रत्येक मराठी माणसाला मंत्रमुग्ध केले होते आणि त्याच्या नटसम्राट नाटकाचे आव्हान हे प्रत्येक मराठी नटश्रेष्ठांना शिवधनुष्य पेलण्याइतके कठीण त्याचबरोबर हवेहवेसे वाटते, त्याचमुळे त्याच नाटकावरील चित्रपट आजच्या पिढीलाही आकर्षित करत आहे. आज तात्यासाहेबांचा जन्मदिवस आहे आणि तो मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो तो तात्यासाहेबांच्या मराठीवरील प्रेमामुळेच आणि त्यांच्या मराठी साहित्यक्षेत्रातील भव्यदिव्य कामगिरीमुळेच.
        साहित्यक्षेत्रातील जेवढे काही सन्मान आहेत ते सर्व तात्यासाहेबांच्या दारी चालून आले. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा आटापिटा करावा लागला नाही.१९६० मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्शपदी त्यांची निवड करण्यात आली. त्याच वर्षी "मराठी माती" या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर दोनच वर्षानी (१९६२)त्यांच्या "स्वगत" काव्यसंग्रहाला व १९६४ मध्ये "हिमरेषा"काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शसनाचा पुरस्कार लाभला.१९६४ च्याच मडगाव येथे अखिलभारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा "राम गणेश गडकरी" पुरस्कार त्यांना१९६५ मध्ये प्राप्त झाला‌ सुरवातीच्या काळात आपल्यावर गडकऱ्यांची मोहिनी होती व त्यांची नाटके आपण अनेकवेळा वाचली होती व त्यातील संवाद मुखोद्गतही होते असे त्यांनी म्हटले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुसुमाग्रजांचे पहिले प्रेम अभिनयावर होते आणि आयुष्याची पहिली तीन वर्षे त्यांनी चित्रपटात काम करण्याच्या हेतूने वाया घालवली होती आणि त्या काळात "सती सुलोचना" या चित्रपटाची कथा त्यानी लिहिली होती व त्यात भूमिकाही केली होती‌‌. सुदैवाने तो चित्रपट डब्यात पडून राहिला व त्यांनी पत्रसृष्टीत प्रवेश केला.
          त्यांच्या "ययाती आणि देवयानी" या नाटकास १९६७ या वर्षी तर"वीज म्हणाली धरतीला या नाटकास १९६७ मध्ये राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. मराठी नाट्यसंमेलनाचे ते१९७० या वर्षी अध्यक्ष होते..१९७१ मध्ये त्यांच्या "नटसम्राट"या नाटकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला. तर त्याच नाटकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना १९७४ मध्ये मिळाला. पुढेही त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. वरील सर्व पुरस्कारांवर कळस चढवणारा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान म्हणजे "ज्ञानपीठ पुरस्कार" त्यांना १९८७ मध्ये दण्यात आला. भारत सरकारच्या "पद्मभूषण" पुरस्काराने त्यांना १९९१ मध्ये भूषविण्यात आले तर अंतराळ वैज्ञानिकांनीही त्यांच्या साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील कामगिरीचा गौरव अंतराळातील एका ताऱ्यास "कुसुमाग्रज" हे नाव देऊन केला.
      तात्यासाहेबांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही तेवढेच महत्त्वाचे आहें. नाशिक शहराचा  सांस्कृतिक आधारवड असेच त्यांचे स्थान शेवटपर्यंत राहिले आणि त्याचमुळे नाशिकमधील सर्व सांस्कृतिक चळवळींचे ते स्फूर्तिस्थान आणि प्रत्यक्ष कृतीशील व्यक्तिमत्व होते. "लोकहितवादी मंडळ" हे त्यांच्या प्रयत्नास आलेले भरघोस फळ. त्यांनी नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयातही लक्ष घातले व वाचनालयासाठी प्रशस्त इमारत निर्माण करण्यात यश मिळवले या इमारतीत एक आधुनिक नाट्यगृहही सामावण्यात आले आहे.
         खाजगी आयुष्यात मात्र ते  संकोची व प्रसिद्धिविन्मुख होते त्यामुळे २७ फेब्रुवारी या आपल्या जन्मदिनी  अभिनंदनाचा वर्षाव टाळण्यासाठी ते अज्ञात स्थळी रवाना होत. बाह्य जगापासून आपला अलिप्तपणा कटाक्षाने जपण्याचा थोर कलावंताचा गुण त्यांच्यात पुरेपूर होता. तरीही सामाजिक कार्यात झोकून देण्याचा त्याचा गुण हा त्यांच्या वृत्तीतील विरोधाभास असेच म्हणावे लागेल.दिवसभर तात्या आपल्या आवडत्या खुर्चीवर सिगरेट शिलगावून बसले आहेत व माणसे येत आहेत, त्यातील कोणी त्यांच्या कवितेचा-नाटकाचा भक्त असेल तर कोणी आपले लेखन दाखवून मार्गदर्शनाची अपेक्षा करतो आहे. कोणी तात्यांनी प्रेरणा दिलेल्या सांस्कृतिक कार्यात सामील होण्याचे  बोलून दाखवत आहे तर कोणी आपली व्यथा तात्यांना सांगून ती हलकी करण्यासाठी आलेला आहे. तात्या सगळ्यांना शांतपणे प्रतिसाद देत आहेत.असे द्रूश्य दिवसभर असे. तात्या आपला बहुमोल वेळ असा वाया घालवत आहेत असे त्यांच्या साहित्यिक मित्रांना वाटत असे. तरीही त्यांचे लेखनाकडे तितकेच लक्ष होते नाहीतर इतका प्रचंड व गुणसंपन्न साहित्यप्रपंच त्यांच्या हातून घडलाच नसता. त्यानुळे त्या मित्रांनी"तात्या लिहीत बसले आहेत हे आम्ही कधी पाहिले नाही.ते लिहितात हे कुणाला कधी कळले नाही , पण ते लिहितात हे तर नक्कीच "असे उद्गार काढले आहेत. त्या साहित्यसम्राटाला त्याच्या जन्मदिनी अभिवादन !