'काँग्रेसमुक्त भारत' घोषणेचा खरा अर्थ

मोदी-शाह जोडगोळीने 'काँग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा काय दिली आणि सगळे लोकशाहीवादी पुरोगामी विचारवंत खवळून काय उठले. अर्थात मोदी सरकार आल्यावर त्यांना खवळून उठायला निमित्तही लागत नाही म्हणा. पण या घोषणेबाबत झाले आहे असे की नीट अर्थाकलन न झाल्यानेच सगळ्या अज्ञजनांचा क्रोधाग्नी धडाडला आहे. त्यांचे अज्ञान दूर करावे म्हणून हा लिखाणप्रपंच.
सर्वप्रथम लक्षात घेण्याचा मुद्दा हा, की ही घोषणा कुणी रक्तपिपासू राज्यांतल्या (बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आदि) राजकारण्याने केलेली नाही, तर 'धंदा' ज्यांच्या जनुकांत भिनला आहे अशा राज्यातल्या दोघाजणांनी केलेली आहे. त्यामुळे बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी डाव्यांना (वा केरळमध्ये डाव्यांनी संघवाल्यांना) 'नाहीसे करून टाकण्या'ची धमकी द्यावी तसा हा प्रकार नाही. 'धंद्या'त नेहमी चालणारा विलीनीकरण आणि मालकी हस्तांतरण (मर्जर अँड ऍक्विझिशन) असा हा प्रकार आहे.
आणि बिचाऱ्या मोदी-शाह जोडगोळीने आपले हे 'धंदेवाईक' इरादे पुरेसे स्पष्ट केले आहेत. आसाममध्ये भाजप सत्तेवर आला. हिमांत बिस्व शर्मा यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झाले असते असे सुब्रहमण्यम स्वामी तरी बरळू शकतील काय? आणि काँग्रेस नसेल तर असा बिस्व शर्मांचा पुरवठा करेल कोण?
महाराष्ट्रात तर भाजपने हे अजूनच उलगडून सांगितले आहे. होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांकडे जरा नीट बघा. दहा जागांसाठी बारा उमेदवार. राज्यसभेत सहा जागांसाठी सहा. मग विधानपरिषदेत हे जास्तीचे दोन उमेदवार आले कुठून? एक भाजपचा. आणि एक बंडखोरही भाजपचाच. आपली पाच उमेदवार निवडून आणण्याची ताकद असताना सहा उमेदवार उभे करून सौदे-वायदे सुरू करून द्यायचे, आणि वरून फोडणी म्हणून एक बंडखोरही पेरायचा ही काँग्रेसी (महाराष्ट्रात शरद काँग्रेसी) परंपराच फक्त भाजपने स्वीकारली नाही, तर राष्ट्रवादी आणि मनसेमधून आयात उमेदवारांना (त्यातही एका उमेदवारावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप) संधी देऊन ती परंपराही स्वीकारली. अशा रीतीने 'आपली मते फुटतील की काय' ही धडकी दोन्ही काँग्रेसच नव्हे तर शिवसेनेच्या मनातही भरवून देऊन भाजपने टेस्ट क्रिकेटचे एकदम आयपीएल करून टाकले.
अजून नाही उमजले? मग नाथाभाऊ खडसेंकडे पहा. विद्यमान मंत्री सरळ आणि उघडपणे कवडीमोलात सरकारी जमीन हडपतो आणि तरीही आपण निष्पाप आणि निर्दोष असल्याचा जप करत बसतो. आणि अजूनही खडसेबुवा काय करताहेत ते पहा. मंत्रीमंडळाच्या बैठकीला दांडी मारून जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी शक्तीप्रदर्शनाचे मेळावे, त्यात आपल्या विरोधकांचा सर्वप्रकारच्या भाषेत उद्धार. ही इंदिरा गांधींनी अलाहाबाद हायकोर्टात केस हरल्यावर १९७५ साली घालून दिलेली परंपरा निष्ठेने अंगी बाणवून घेतलीसुद्धा या सात वेळा भाजपचा आमदार झालेल्या पठ्ठ्याने.
थोडक्यात काय, 'काँग्रेसमुक्त भारत' या घोषणेचा खरा अर्थ 'काँग्रेसयुक्त भाजप' असा आहे. कालचक्र बरे हे, कधी असे फिरते तर कधी तसे. काँग्रेसने महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष गिळून टाकला (उरलेल्या धांदोट्यांना रिपब्लिकन पक्ष म्हणणे हे श्रीपाल सबनीसांना विचारवंत म्हणण्यासारखे आहे) आता भाजप राष्ट्रपातळीवर काँग्रेसला गिळायला निघालाय.
शेवटी भाजपने आपला 'पार्टी विथ अ डिफरन्स' हा लौकिक जपला. 'पार्टी मे बी डिफरंट, वी आर नॉट' हे सिद्ध करून.