चिमूटभर

बेल वाजताच ज्योती चौधरी खुर्चीवरून उठल्या. हातातील मासिक ठेवले. हळुहळू चालत दारापर्यंत आल्या. घरातच घसरून पडल्याने त्यांचा डावा पाय दुखावला होता. दार उघडताच समोर एक मुलगी दिसली.  पंजाबी ड्रेस. गव्हाळ वर्ण. 
    "ओळखलंत बाई?  मी दीपिका."
    बाईंना ओळख पटेना. 
    "मी दीपिका, बाई. दीपिका सुभेदार."
    "तुम्ही आत या, अशा उन्हात उभ्या राहू नका."
    बाईंनी दीपिकेला आत घेतले. तिने छोटीशी पिशवी बाजूला ठेवली. 
    "बसा."
    दीपिका बसता बसता म्हणाली.
    "बाई, बस म्हणा ना. मी लहान आहे तुमच्यापेक्षा. तेव्हाही होते आणि आजही आहे." 
   "मी खरंच ओळखलं नाही गं..."
   "सातवी अ चा वर्ग. पंधरा वर्षांपूर्वीचा." 
    "इतकी मुलं हाताखालून गेली. सगळीच नावं काही लक्षात राहात नाहीत बाळ.."
    "बाई, मी दीपिका. नाट्यवाचनात आमचा वर्ग पहिला आला होता..मी त्यात भाग घेतला होता.. तुम्ही आम्हाला, विशेषतः मला शाबासकी दिली होतीत. एक चांगला प्रोजेक्ट केल्याबद्दलही तुम्ही माझं कौतुक केलं होतंत. सगळ्यात नीटनेटक्या वहीबद्दलही माझं कौतुक केलं होतं...अगदी भरघोस. 
  चौधरी बाईंना हळुहळू शाळेच्या भिंती, वर्ग, तास आठवू लागलं. त्यांचा सातवीचा वर्ग डोळ्यांसमोर येऊ लागला. अनेक मुलींची चेहरे सरकले आणि एका मुलीच्या दंडावर चुकून लागलेलं कर्कटकही आठवलं. त्यांनी झटकन दीपिकेचा दंड पाहिला आणि खूणच पटली. चौधरी बाई हसल्या. डोळेही भरले. त्यांनी उचंबळून येऊन दीपिकेला जवळ घेतलं... 
   "आत्ता आठवलं, आठवलं गं बाई." 
   "बाई..."
   दीपिकेलाही भरून आलं. तिने बाईंच्या पायाला हात लावला.
   "अगं, नमस्कार काय करतेस, मोठ्या झालात आता तुम्ही..."
   बाईंनी दीपिकेला बसवलं. स्वतः तिच्या शेजारी तिचाच हात हातात घेऊन बसल्या.
   "बोल, काय म्हणतेस? कशी काय आज तू माझ्या घरी? खरं तर हे आमचं नवं घर. मुलाने घेतलेलं. तुला कसं कळलं ? लग्न बिग्न झालं की नाही?"
   बाईंनाही किती चौकशी करू, किती नको असे झाले.
   "बाई, पत्ता काढला मी. एखादी गोष्ट हवी असली की माणूस हवे तितके प्रयत्न करतो." 
"पण, तू आज...आज तर गुरुपौर्णमाही नाही. मग.."
दीपिकेला पुन्हा भरून आलं आणि तिचा बांध फुटला. 
"अगं, अशी काय करतेस? काय झालं ? ये बाळ, जवळ ये.."
दीपिकेने बाईंच्या कुशीत शिरून खूप रडून घेतलं. भावनांचे कढ ओसरल्यावर ती जरा कुठे शांत झाली. बाईंनी तिला पाणी दिलं. कढत चहा करून आणला.  
 "बोल आता. शांतपणे बोल."
 "बाई, कसं सांगू ?"
 "सांग, जे असेल ते. आता तू माझ्याकडे आली आहेस ना मग सांग अगदी निःसंकोचपणे.  कुठलाही प्रॉब्लेम असू दे."
 "बाई, खरं तर प्रॉब्लेम नाही आणि आहे सुध्दा. शाळेतून बाहेर पडले. कॉलेजला गेले. डिग्री मिळवली. बी.एस.सी. झाले.कधी कमी मार्क पडले, कधी जास्त. लग्न झालं. मला तीन वर्षांचा मुलगा आहे. नवरा अकाउंटंट आहे. सासूबाई प्रेम करतात. सगळं व्यवस्थित चाललं आहे पण....पण मला कसंतरीच झालंय हो...मला सतत वाटत असतं...वाटत असतं की.."
"काय? प्रॉब्लेम नाही असं म्हणतेस आणि आहे असंही म्हणतेस..व्यवस्थित चाललंय ना सगळं..
"बाई, सगळं व्यवस्थित चालणं वेगळं आणि ....तुम्हाला आठवतं का, माझंच नाही तर आमच्या वर्गातल्या इतरही दोन तीन मुलांचं तुम्ही कौतुक करायचात. आम्ही जे काही करायचो, त्याबद्दल आम्हाला छान म्हणायचात. आमच्याबद्दल इतर शिक्षिकांना सांगायचात. तुमच्या घरीही सांगायचात. तुमच्या हाताखालून गेलेल्या प्रत्येक बॅचमधे काही ना काहीतरी चांगलं तुम्ही हेरायचात. तुम्हाला वाईट असं कधीही काहीही दिसलं नाही. कमतरता दाखवण्याचा तुमचा स्वभाव नव्हताच. तुम्ही कमतरता दाखवली असली तरी ती एखादेवेळेस. तुमच्या शब्दांमुळे साधारण काम करणाऱ्यालाही उमेद मिळायची. तुमच्या शब्दांमुळे खूप बरं वाटायचं, बाई. पण आता सगळंच बदललंय." 
"मग, आता कुणी कौतुक करत नाही का तुझं?"
"करतात, बाई, करतात. पण, ते जेवढ्यास तेवढं असतं. कॉलेजमधून पास होईपर्यंत बरी परिस्थिती होती. कॉलेजमधल्या प्राध्यापकांनी, मित्रांनी माझ्या गुणांना नेहीच दाद दिली. आम्ही बक्षिसं वगैरे मिळाल्यावर मस्त सेलेब्रेट करायचो. फोटो काढायचो. लग्न झाल्यावर ते सगळं बदललं. परवाच मी सोसायटीच्या कार्यक्रमात मुलांकरिता एक नाटिका लिहिली. ती नवऱ्याला दाखवली तर तो फक्त "वा" एवढंच म्हणाला. पुढे त्याने काहीही विचारलं नाही. उलट, "अक्षर थोडं आणखी चांगलं काढ" म्हणून सांगितलं. वाया गेलेल्या वस्तूंपासून मी एक पर्स बनवली व सासूबाईंना दाखवली तर त्या "छान केली आहेस. चल, आता मला भिशीला जायचंय. पुढच्या वेळी हा रंग नको, तो घे" एवढं म्हणून निघून गेल्या. बाकी कसलाही इंटरेस्ट घेतला नाही. मी नवा पदार्थ केला  तर "चांगला झालाय, किंचित मीठ कमी कर". असं म्हटलं जातं. तो विषय तिथेच थांबतो.  हे असं चाललंय सतत. माझ्या प्रत्येक कामाबद्दल कोणी उत्साहाने भरपूर बोललंय... असं झालंच नाही फार... फार अस्वस्थता आलीय हो बाई. एवढंसं काहीतरी बोलतात आणि त्यातही असं हवं होतं, असं म्हणतात. अगदी विरस होतो. खूप दिवस गेले आणि मला एकदम तुम्ही आठवलात, तुमचं भरघोस कौतुक आठवलं आणि वाटलं, सरळ तुम्हाला भेटावं आणि विचारावं, हे असं का होतंय. मीच कशात कमी पडतीये की ते लोकच तसे आहेत... माहेरी तरी किती वेळा जाणार आणि त्यांना सांगणार ?  आई बाबा म्हणतात - दीपा, आम्हाला तुझं कौतुक नेहमीच होतं पण सासरच्या विषयात  आम्ही एका लिमिटपुढे पडू शकत नाही. मी मान्य करते की, सासरचे लोक एक शब्द तरी चांगला उच्चारतात, पण बाई, असल्या चिमूटभर कौतुकाने माझं पोट भरत नाही हो..."
     दीपिका हमसून हमसून रडू लागली. बाईंनी तिला पुन्ही एकदा जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवला. तिला शांत केलं. 
    "बाई, तुम्ही याल का हो माझ्या सासरच्यांना समजवायला? तुम्ही जरा जास्त पाठिंबा द्या सुनेला, खूप चांगलं बोला, असं सांगाल का? सांगाल का की, ही आमच्या शाळेची खूप चांगली मुलगी होती ...ते दिवस हरवलेत हो बाई.. मला पुन्हा ते दिवस द्या ना...त्यांच्यात मला जगायचंय पुन्हा.. किंवा मला तरी तिथे नेऊन सोडा...
    चौधरी बाई विचारात हरवून गेल्या.  आपल्या भरपूर प्रशंसेची तिला इतकी सवय झाली आहे ? बाकीच्या मुलींचंही असंच होत असेल ? दोष दाखविण्याचं पारडं जरा खालीच राहिलं का ?