"वेज ऑफ सीईंग" ह्या जॉन बर्गरलिखित पुस्तकातील प्रकरणाचे मराठी भाषांतर. हे पुस्तक लेखकाने बीबीसीवर सादर केलेल्या माहितीपट-मालिकेवर आधारित आहे. माहितीपटाचा खालील प्रकरणाशी संबंधित भाग यूट्यूबवर इथे उपलब्ध आहे.

ज्यांना विरोध होऊ लागला आहे परंतु पूर्णत: बाद झालेल्या नाहीत अशा रूढी व संकेतांनुसार स्त्री व पुरुषाची समाजमनावर उमटणारी प्रतिमा वेगवेगळी असते. पुरुषाची प्रतिमा त्याच्या बळावर आणि बलप्रयोगाच्या शक्यतेवर अवलंबून असते. शक्यता जेवढी जास्त तेवढा त्याचा प्रभाव अधिक. शक्ती कमी असेल किंवा तिच्या वापराची शक्यता नसेल तर त्याची फारशी छाप पडत नाही. ही शक्ती नैतिक, शारीरिक, व्यक्तिमत्त्वातून उद्भवणारी, आर्थिक, सामाजिक, लैंगिक – कोणत्याही स्वरूपाची असू शकते. पण तिचा वापर कायम दुसऱ्यावर केला जातो. पुरुष तुम्हाला किंवा तुमच्यासाठी काय करू शकतो हे त्याचे व्यक्तिमत्त्व सांगत असते. ते कदाचित खरे नसेलही. जे करणे त्याला शक्य नाही ते करू शकण्याचा तो आव आणत असेल. पण हा आवही इतरांवर गाजवण्याच्या अधिकराचा असतो.
ह्या विरुद्ध, स्त्रीचे व्यक्तिमत्त्व तिची स्वत:विषयीची वृत्ती, व तिला काय केले जाऊ शकते व काय नाही हे व्यक्त करते. तिची प्रतिमा तिच्या हावभावातून, आवाजातून, मतांमधून, शब्दनिवडीतून, पोषाखातून, तिने निवडलेल्या सभोतालातून, तिच्या रुची-अभिरुचीतून अभिव्यक्त होते. खरे म्हणजे अशी एकही कृती नाही जी तिच्या छबीत भर टाकत नाही. ही प्रतिमा तिच्याशी इतकी एकरूप असते की पुरुष त्या प्रतिमेलाही शरिराच्या उबेप्रमाणे, किंवा गंधाप्रमाणे शारीरच समजतात.
आता-आतापर्यंत स्त्रीच्या जन्माला येणे म्हणजे पुरुषांच्या राखणदारीत, त्यांनी आखून दिलेल्या चौकटीत जन्म घेणे व जगणे. अशा मर्यादित जागेत, देखरेखीत जगत स्त्रियांनी चातुर्याने समाजात आपले स्थान निर्माण केले खरे, पण त्यासाठी स्त्रीला दुभंगण्याची किंमत मोजावी लागली. तिला सतत स्वत:चे भान ठेवावे लागते. स्वत:बद्दलची तिची प्रतिमा सावलीसारखी कायम तिच्या सोबत असते. सहज खोलीत इथून तिथे जाताना असो वा वडिलांच्या मृत्यूवर रडताना असो, चालताना किंवा रडताना आपण कसे दिसू हा विचार ती टाळू शकत नाही. अगदी लहानपणापासून तिला आपल्या वागण्या-बोलण्यावर लक्ष ठेवायला शिकवले गेले असते.
आणि म्हणून ती आपल्या व्यक्तित्वाचे दोन निराळे, स्वतंत्र घटक असल्याचे मानू लागते - लक्ष ठेवणारी, व जिच्यावर लक्ष ठेवले जात आहे ती.
आपण कसे दिसतो, काय करतो ह्यावर तिला नजर ठेवावी लागते, कारण ती इतरांना, विशेषत: पुरुषांना कशी दिसते ह्यावर तिचे जीवनातील 'यश' अवलंबून असते. तिच्या स्वजाणिवेची जागा इतरांनी केलेल्या कौतुकाने घेतलेली असते.
पुरुष आधी स्त्रियांना न्याहाळतात, आणि मगच त्यांच्याशी संपर्क साधतात. त्यामुळे स्त्री पुरुषाला कशी दिसते ह्यावर तो तिच्याशी कसा वागेल हे अवलंबून असते. त्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याकरता स्त्रीला ती अंतर्भूत करणे भाग असते. स्त्रीचा स्वत:वर लक्ष ठेवणारा भाग लक्ष ठेवल्या जाणाऱ्या भागाला जी वागणूक देतो ती वागणूक एकसंध स्त्रीला इतरांकडून अपेक्षित असते. स्वत: स्वत:ला दिलेल्या ह्या अनुकरणीय वागणूकीतून तिची प्रतिमा बनते. प्रत्येक बाईची प्रतिमा तिच्या सान्निध्यात काय करण्याची मुभा आहे आणि काय नाही हे ठरवते. तिच्या प्रत्येक कृतीकडे तिच्याशी लोकांनी कसे वागावे ह्याचे द्योतक म्हणून पाहिले जाते, मग त्या कृतीचे उद्दिष्ट व त्यामागील प्रयोजन काहीही असो. जर तिने ग्लास जमिनीवर फेकला तर ही तिची राग व्यक्त करण्याची रीत समजली जाते. इतरांनी आपला राग असाच व्यक्त करावा अशी तिची इच्छा असल्याचे मानले जाते. मग पुरुषाने ग्लास फेकणे हा त्याच्या रागाचा भाग मानला जातो. स्त्रीने एखादा चांगला विनोद केल्यास ती स्वत:तील विदुषकाला कशी वागवते ह्याचे ते उदाहरण ठरते. लोकांनी विदुषकी चाळे करणारी स्त्री म्हणून तिला वागवावे असे ती सुचवत असते. कारण विनोदाकरता विनोद केवळ पुरुषच करू शकतात.
हे सर्व सोपे करायचे झाल्यास असे म्हणता येईळ की पुरुष कृती करतात व स्त्रिया देखावे निर्माण करतात. पुरुष स्त्रियांकडे बघतात. स्त्रिया लोकांना आपल्याकडे बघताना बघतात. ह्यातून स्त्री-पुरुष संबंधच नाही तर स्त्रियांचे स्वत:शी असलेले संबंध ठरतात. स्त्रीचा स्वत:वर लक्ष ठेवणारा भाग पुरुष असतो, व लक्ष ठेवला जाणारा भाग, स्त्री. अशा प्रकारे ती स्वत: स्वत:चे रूपांतर एका वस्तूत करते - एक प्रेक्षणीय वस्तू.
युरोपीय तैलचित्रांच्या एका गटाचा स्त्रिया हाच प्रमुख, वारंवार येणारा विषय होता. तो गट म्हणजे नग्नचित्रे.१ स्त्रियांचे प्रेक्षणीय वस्तू म्हणून कोणत्या निकष व परंपरांनुसार मूल्यमापन केले जात ते युरोपीय नग्नचित्रांतून दिसून येते.
ह्या परंपरेतली पहिली नग्नचित्रे ऍडम व ईवची. जेनेसिसमधील ती गोष्ट अशी आहे:
आणि जेव्हा त्या स्त्रीने पाहिले की त्या वृक्षास सुंदर, गोमटी फळे आली आहेत, व तो वृक्ष शहाणपण देतो, तेव्हा तिने ते फळ स्वत: भक्षण केले, व आपल्या पतीसही दिले, आणि त्यानेही ते भक्षण केले.
आणि त्या दोघांचे डोळे उघडले, अन् दोघांना आपल्या विवस्त्र असण्याची जाणीव झाली, व त्यांनी अंजिराच्या पानांची वस्त्रे शिवून परिधान केली.... आणि मग देव त्या पुरुषास साद घालत म्हणाला, "तू कोठे आहेस?" त्याने उत्तर दिले, "मी उपवनात तुझा आवाज ऐकला. मला भीती वाटली कारण मी विवस्त्र होतो, आणि मी लपून बसलो."
देव त्या स्त्रीला म्हणाला, "मी तुझी दु:खे, व गर्भधारणा खूप वाढवीन; तुला आत्यंतिक प्रसववेदना होतील; तुला तुझ्या नवऱ्याविषयी आसक्ती असेल, आणि त्याची तुझ्यावर सत्ता राहील."
ह्या गोष्टीत लक्षवेधी काय आहे? दोघांना आपल्या विवस्त्रपणाची जाणीव झाली कारण सफरचंद खाल्ल्यामुळे त्यांची एकमेकांकडे पाहण्याची दृष्टी बदलली. विवस्त्रतता निर्माण झाली ती पाहणाऱ्याच्या मनात.
दुसरी लक्षवेधी गोष्ट अशी की स्त्रीला दोषी ठरवून तिला पुरुषाच्या अधीन राहण्याची शिक्षा दिली गेली. पुरुष तिच्या बाबतीत देवाचा प्रतिनिधी झाला.
मध्ययुगीन कलापरंपरेत ह्या कथेचे चित्रांकन व्यंगचित्रासारखे दृश्यापुढे दृश्य चितारून केले गेले.

रिनेसन्सकालात ही कथन परंपरा लोप पावली. चितारलेला क्षण लज्जेचा क्षण ठरला. ते दोघे अंजिराची पाने लेऊन असतात किंवा आपल्या हातांनी लज्जारक्षण करत असतात. परंतु आता त्यांना एकमेकांपेक्षा पाहणाऱ्यांमुळे लाज वाटते.

नंतर ह्या लाजेचेच एक प्रकारे प्रदर्शन होऊ लागले.


चित्रकलेने धर्मापासून फारकत घेण्यास सुरुवात केल्यावर नग्नचित्रांसाठी इतर विषय घेण्याची संधी चित्रकारांना लाभली. पण त्या साऱ्या चित्रांतील समान गर्भितार्थ म्हणजे चित्राचा विषय असलेल्या स्त्रीला आपल्याला कोणीतरी बघत असल्याची असलेली जाणीव.
ती जशी आहे तशी विवस्त्र नाही.
तिचे विवस्त्रपण पाहणाऱ्याच्या नजरेला जसे दिसते तशी ती विवस्त्र आहे.
अनेकदा हाच त्या चित्राचा खरा विषय असतो. उदाहरण म्हणून 'सूसॅन्ना ऍन्ड द एल्डर्स' हा चित्रकारांच्या आवडीचा विषय घ्या. सूसॅन्ना आंघोळ करत असताना तिला चोरून बघणाऱ्या एल्डर्समध्ये आपणही असतो. आपण तिला बघत असतो आणि ती मागे वळून आपल्याला बघताना पाहत असते.

ह्याच विषयावर टिंटोरेट्टोने रंगवलेल्या आणखी एका नग्नचित्रात सूसॅन्ना आरशात स्वत:ला पाहत आहे. आशा रीतीने तिला पाहणाऱ्या प्रेक्षकांप्रमाणे तीही एक प्रेक्षक झाली आहे.

बऱ्याच वेळा आरसा स्त्रीच्या गर्विष्ठपणाचे प्रतीक म्हणून वापरला गेला आहे. हे बोधामृत पाजणे बहुतेकदा दांभिक होते.

एका स्त्रीला बघणे आवडल्यामुळे तुम्ही तिचे विवस्त्र चित्र चितारलेत. तिच्या हातात एक आरसा दिलात आणि चित्रास नाव दिलेत व्हॅनिटी. अशा रीतीने ज्या स्त्रीची नग्नता तुम्ही स्वत:च्या आनंदासाठी रंगवलीत तिलाच अनैतिक ठरवून तिची निर्भर्त्सना केलीत.
आरशाचे खरे प्रयोजन वेगळेच होते--स्त्रीकडे मुख्यत: एक प्रेक्षणीय वस्तू म्हणून बघण्यात तिलाही सामील करून घेणे.
'द जजमेंट ऑफ पॅरिस' हा असाच आणखी एक विषय. त्यातही एक किंवा अनेक पुरुष विवस्त्र स्त्रियांकडे बघताहेत हीच मूलभूत कल्पना.

पण आता पाहण्यात निवाड्याची भर पडली आहे. पॅरिसला जी स्त्री सर्वात सुंदर वाटते तिला तो सफरचंद बक्षीस देतो. अशा रीतीने सौंदर्य स्पर्धात्मक झाले. (आजकालच्या सौंदर्यस्पर्धा ह्या जजमेंट ऑफ पॅरिसचे आधुनिक रूप आहेत.) ज्या स्त्रियांना सुंदर ठरवले जात नाही त्या सुंदर नाहीत. ज्या आहेत त्यांना बक्षीस दिले जाते.

बक्षीस काय तर परीक्षकाच्या मालकीचे होणे--अर्थात त्याच्यासाठी उपलब्ध असणे. दुसऱ्या चार्ल्सने लेलीवर एक चित्र गुप्तपणे चितारण्याची कामगिरी सोपवली होती. नग्नचित्र परंपरेतील ते एक अतिशय मासलेवाईक चित्र आहे. वरकरणी ते विनस आणि क्युपिड म्हणून खपू शकेल. प्रत्यक्षात ते नेल ग्विननामक राजाच्या एका रखेलीचे आहे. तिच्या नग्नतेला न्याहाळणाऱ्या प्रेक्षकाकडे ती थंडपणे पाहत आहे.

परंतु ही नग्नता तिच्या भावना व्यक्त करत नाही; मालकाच्या भावना किंवा मागण्यांपुढे तिने तुकवलेली मान दर्शवते. (मालक स्त्री व चित्र, दोन्हीचा.) राजाने जेव्हा हे चित्र इतरांना दाखवले तेव्हा तिची ही शरणागती पाहून त्याच्या पाहुण्यांना त्याचा हेवा वाटला.
नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी की भारतीय, फारसी, आफ्रिकी, कोलंबसपूर्व अयुरोपीय कलापरंपरांमध्ये नग्नता कधीही अशी दुबळी नसते. अन् ह्या परंपरांमध्ये लैंगिक आकर्षण हा एखाद्या चित्राचा विषय असला तर त्यात सहसा संभोग दाखवलेला असतो, आणि त्यात स्त्री ही पुरुषाइतकीच सक्रीय असते. दोघांच्या कृती एकमेकांना पूरक असतात.



आता आपण नागडेपणा व नग्नता ह्यात युरोपीय कलापरंपरेने केलेला फरक समजू शकतो. 'द न्यूड' ह्या आपल्या पुस्तकात केनेथ क्लार्क म्हणतात की नागडे असणे म्हणजे केवळ विवस्त्र असणे, परंतु नग्नचित्र हा कलाविष्कार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नग्नचित्र हे चित्रापेक्षा चित्राने साध्य केलेला दृष्टिकोन आहे. काही प्रमाणात हे खरे आहे. पण 'नग्न'तेकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन कलेपुरता मर्यादित नाही; नग्न छायाचित्रे, त्यांच्यासाठी नग्न होऊन विशिष्ट प्रकारे उभे राहणे, हातवारे करणे हे सगळे असतेच की. हे खरे की नग्नचित्र नेहमी रीतिबद्ध असते. हे रीत-रिवाज कलेच्या एका विशिष्ट परंपरेतून उगम पावतात.

ह्या रिवाजांचा अर्थ काय? नग्नचित्र काय सूचित करते? केवळ कलाप्रकाराच्या संदर्भात ह्या प्रश्नांची उत्तरे देणे पुरेसे नाही कारण नग्नचित्रे जिवंत लैंगिकतेशी संबंधित आहेत हे उघड आहे.
विवस्त्र असणे म्हणजे आपण जसे आहोत तसे असणे.
नग्न असणे म्हणजे इतरांनी आपल्याला विवस्त्र पाहणे आणि तरीही आपण एक व्यक्ती म्हणून ओळखले न जाणे. विवस्त्र देहाचे नग्नचित्र बनण्यासाठी त्याकडे एक वस्तू म्हणून पाहावे लागते. (त्याच्याकडे वस्तू म्हणून पाहिले की वस्तू म्हणून त्याचा वापर करण्याची प्रेरणा मिळते.) विवस्त्रपण स्वत:स प्रकट करते. नग्नतेचे प्रदर्शन मांडले जाते.
विवस्त्रतेत वेषांतर नसते, लपवाछपवी नसते.
प्रदर्शनात आपलीच त्वचा, आपलेच केस वापरून कधीच उतरवता न येणारे वेषांतर केले जाते. नग्नतेला कधीही विवस्त्र होऊ न शकण्याचा शाप असतो. नग्नता हा पोशाखाचा प्रकार आहे.
सर्वसाधारण युरोपीय नग्नचित्रात मुख्य पात्र कधीच चितारलेले नसते. ते पात्र म्हणजे चित्रासमोर उभा राहून ते पाहणारा प्रेक्षक. हा पुरुष असल्याचे गृहीत धरले जाते. सर्व काही त्याला उद्देशून असते. तो आहे म्हणून सारे आहे असेच वाटले पाहिजे. चित्रातील व्यक्ती त्याच्यासाठीच नग्न आहेत. पण तो मात्र कोणीतरी अपरिचित आहे-- अन् त्याने कपडे घातलेले आहेत.
ब्रॉन्झिनोच्या 'ऍलेगरी ऑफ टाईम ऍन्ड लव'चे उदाहरण घ्या.

ह्या चित्राच्या जटिल प्रतीकात्मकतेशी तूर्तास आपल्याला कर्तव्य नाही, कारण त्याने चित्राच्या वैषयिक आकर्षणावर परिणाम होत नाही. हे चित्र सर्वप्रथम लैंगिक उत्तेजना निर्माण करणारे आहे. बाकी सारे नंतर.
फ्लॉरेन्सच्या ग्रॅन्ड ड्यूकने हे चित्र फ्रान्सच्या राजाला भेट दिले होते. उशीवर गुढगे टेकून स्त्रीचे चुंबन घेणारा मुलग क्यूपिड आहे. परंतु तिचे शरीर ज्या प्रकारे चितारले आहे त्याचा त्या चुंबनाशी कोणताही संबंध नाही. तिच्या शरीराची मांडणी चित्र पाहणाऱ्या पुरुषाला ते नीट दिसावे अशी करण्यात आली आहे. हे चित्र त्याची कामवासना चेतवण्यासाठी रंगवले आहे. तिच्या कामेच्छांशी त्याचा संबंध नाही. (इथे व एकूण युरोपीय चित्रपरंपरेत, स्त्रीच्या देहावरील केस न चितारण्यामागे हेच कारण आहे. केसांचा लैंगिक क्षमतेशी, आवेगाशी संबंध आहे. त्या आवेगाची मक्तेदारी आपल्याकडे आहे असे पाहणाऱ्याला वाटण्याइतपत स्त्रीचा वासनावेग कमी करणे आवश्यक आहे.) स्त्रिया इतरांची भूक भागवण्यासाठी आहेत, स्वत:ची नव्हे.
ह्या दोन स्त्रियांच्या चेहऱ्यांवरील भावांची तुलना करा. एक इन्ग्रेसच्या प्रसिद्ध तैलचित्राची मॉडेल व दुसरी, स्त्रियांची नग्न छायाचित्रे छापणाऱ्या नियतकालिकातील मॉडेल.

दोघींच्या चेहऱ्यावरील भावात विलक्षण साम्य नाही का? आपल्याकडे पाहणाऱ्या पुरुषाला ठरवून, जाणीवपूर्वक भुरळ पाडण्याकरता आणलेला मोहक भाव आहे तो, भले ती त्याला ओळखत नसली तरी. तो निरखत असलेले तिचे स्त्रीत्व ती त्याला अर्पण करत आहे.
एखाद्या नग्नचित्रात तिचा प्रियकर असतो देखील.

पण त्या स्त्रीचे लक्ष क्वचितच त्याच्याकडे असते. अनेकदा ती दुसरीकडे कुठेतरी पाहत असते किंवा चित्राबाहेरील तिच्या खऱ्या प्रियकराकडे--पाहणाऱ्या मालकाकडे-- पाहत असते.
जोडप्यांची कामक्रीडा दाखवणारा अश्लील तैलचित्रांचा एक खास गट होता (विशेषत: अठराव्या शतकात). पण कल्पनाविलासात प्रेक्षक-मालक चित्रातील पुरुषाची जागा घेणार हे इथेही स्पष्ट असे. तुलना करायची झाल्यास अयुरोपीय चित्रांतील रतिमग्न जोडपी ही इतर अनेक रतिमग्न जोडप्यांच्याच प्रतिमा डोळ्यांपुढे आणतात. "आम्हा सर्वांना हजारो हात-पाय आहेत, आम्ही कधीच एकटे नसतो."
रिनेसन्सोत्तर जवळजवळ सारी युरोपीय लैंगिक प्रतिमासृष्टी शब्दश: किंवा लाक्षणिक अर्थाने समोरून चितारलेली आहे -- कारण तिच्याकडे पाहणारा मालक हाच त्यात प्रमुख लैंगिक पात्र आहे.
पुरुषांच्या ह्या निरर्थक लांगूलचानाने एकोणिसाव्या शतकातील प्रदर्शित पंडिती चित्रकलेत टोक गाठले.

राजकारणी मुत्सद्दी, व्यापारी अशा चित्रांसमोर उभे राहून चर्चा करत. चर्चेत मात झालेला एखादा सांत्वनासाठी चित्राकडे पाही. त्यात जे दिसे ते त्याला त्याच्या पौरुषत्वाचे स्मरण करून देई.
वर म्हटलेले ज्यांना फारसे लागू होत नाही अशी थोडी अपवादात्मक नग्नचित्रे युरोपीय तैलचित्रपरंपरेत आहेत. खरे म्हणजे ती नग्नचित्रे नाहीत. ती त्या कलाप्रकाराचे मानक मोडतात. ज्यांच्यावर प्रेम केले आहे अशा स्त्रियांची कमी-अधिक विवस्त्र अवस्थेतील ती तैलचित्रे आहेत. लक्षावधी नग्नचित्रांमध्ये असे जेमतेम शंभर अपवाद असतील. जिचे तो चित्र काढत आहे त्या विशिष्ट स्त्रीची वैयक्तिक प्रतिमा चित्रकाराच्या मनात एवढी स्पष्ट आहे की तिथे प्रेक्षकाला वाव नाही. ती प्रतिमा चित्रकाराला त्या स्त्रीशी घट्ट बांधून ठेवते. दगडात कोरलेल्या जोडप्याप्रमाणे दोघे अतूट असतात. पाहणारा त्यांच्यातल्या संबंधाचा केवळ साक्षीदार असतो. तो काहीही करू शकत नाही. आपण तिऱ्हाईत आहोत हे त्याला स्वीकारावे लागते. ती आपल्यासाठी विवस्त्र आहे अशी तो स्वत:ची फसवणूक करू शकत नाही. तो तिचे रूपांतर एका नग्नचित्रात करू शकत नाही. चित्रकाराने तिच्या इच्छा, तिचे हेतू तिच्या देहबोलीत, तिच्या चेहऱ्यात, अगदी प्रतिमेच्या संरचनेत अंतर्भूत केले असतात.

कलापरंपरेतील प्रातिनिधिक आणि असाधारण ह्यांची व्याख्या नग्न/ विवस्त्र अशा सोप्या विरोधाभासाने करता येईल. परंतु विवस्त्रता चितारणे वाटते तितके सोपे नाही.
विवस्त्रतेचे वास्तवात लैंगिक प्रयोजन काय? कपडे स्पर्श आणि हालचालींमध्ये अडथळा आणतात. पण विवस्त्रतेला आपले असे एक स्वतंत्र मोल आहे असे दिसते. आपण दुसऱ्या व्यक्तिला विवस्त्र पाहू इच्छितो. ती आपल्याला ते दृश्य दाखवते व आपण मोका साधतो -- मग ती पहिली वेळ असो की शंभरावी. तिच्या अशा दर्शनाचा, ह्या संपूर्ण उघडे होण्याचा आपल्यावर, आपल्या विषयासक्तीवर काय परिणाम होतो?
विवस्त्रता आपल्या मनावरचा ताण खूप हलका करते. ती स्त्रीसुद्धा इतर कोणत्याही स्त्रीसारखीच आहे, किंवा तो पुरुषही इतर पुरुषांसारखाच आहे ह्याची खात्री पटते. परिचित लैंगिक शरीरयंत्रणेच्या अद्भूत सोपेपणाने आपण भारावून जातो.
अर्थात, ह्याहून काही वेगळे असेल अशी जाणीवपूर्वक तरी आपली अपेक्षा नसते. सुप्त समलिंगी आसक्तीमुळे (अथवा जोडपे समलिंगी असल्यास सुप्त भिन्नलिंगी आसक्तीमुळे) काहीतरी वेगळे असेल अशी किंचित अपेक्षा असू शकते. परंतु ताण हलका का झाला हे समजण्यासाठी सुप्त मनापर्यंत जाण्याची गरज नाही.
वेगळ्याची अपेक्षा नसली तरी आपल्या भावनांची व्यामिश्रता व निकड ह्यातून आलेला अनन्यभाव दुसऱ्या व्यक्तिला (ती/तो) ती जशी आहे तशी पाहून दूर होतो. ती व्यक्तीही तिच्या लिंगाच्या इतरांसारखीच आहे, वेगळी नाही ह्या साक्षात्कारात विवस्त्रतेचे ऊबदार व स्नेहपूर्ण अद्न्यातपण आहे. ह्याविरुद्ध, नग्नता थंड व परकी असते.
वेगळ्या प्रकारे सांगायचे तर विवस्त्रता पहिल्यांदा नजरेस पडते तेव्हाच तिच्यात सर्वसामान्यपणाचा अंश प्रवेश करतो. आपल्याला त्याची गरज असते म्हणूनच हा अंश अस्तित्वात येतो.
त्या क्षणापर्यंत दुसरी व्यक्ती कमी-अधिक प्रमाणात गूढ असते. सलज्जतेचे शिष्टाचार म्हणजे केवळ कर्मठपणा किंवा भावूकता नव्हे. त्या गूढतेची विवस्त्रतेने होणारी क्षती ओळखण्याची समज हवी. क्षतीचे कारण प्रामुख्याने दृश्य असावे. भावनांच्या सूक्ष्म फरकातून बहुआयामी व्यक्तिमत्त्व दर्शवणार्या डोळे, तोंड, खांदे, व हातांवरून लक्ष लैंगिक अवयवांकडे विचलित होते. त्या अवयवांची ठेवण एकच परंतु अत्यंत प्रबळ, आणि करण्यास भाग पाडणारी क्रिया सुचवते. दुसर्या व्यक्तीची अवनती म्हणा, उन्नती म्हणा, तिच्या प्राथमिक लैंगिक गटात होते: पुरुष किंवा स्त्री. आधीच्या आपल्या गुंतागुंतीच्या जाणिवेवर निर्विवाद वास्तवाने मात केल्यामुळे आपल्यावरचे ओझे उतरलेले असते.
विवस्त्रतेच्या पहिल्या दर्शनात सापडणारे सर्वसामान्यपण आपल्यासाठी आवश्यक आहे. ते आपला व वास्तवाचा संबंध तुटू देत नाही. पण ते त्याहून जास्त काहीतरी करते. हे वास्तव नेहमीच्या, परिचित शरीरसंबंधाची आशा दाखवण्याबरोबरच संभोगाची व्यक्तिनिष्ठता सामायिक असण्याची शक्यताही वर्तवते.
गूढतेची क्षती, आणि एक संयुक्त गूढता निर्मिण्याच्या साधनाची उपलब्धी एकाच वेळी घडतात. घटनाक्रम आहे: व्यक्तिनिष्ठ - वस्तुनिष्ठ - व्यक्तिनिष्ठ२.
लैंगिक विवस्त्रतेचे स्थिर चित्रण इतके कठीण का आहे हे आपण आता समजू शकतो. जिवंत लैंगिक अनुभवात विवस्त्रता ही स्थिती नसून प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेतील एक क्षण वेगळा काढल्यास त्याची प्रतिमा रटाळ वाटेल. हा रटाळपणा दोन उत्कट अवस्थांमधील पूल न होता थंड असेल. विवस्त्रतेची बोलकी छायाचित्रे तैलचित्रांपेक्षाही दुर्मिळ असण्यामागे हे एक कारण आहे. प्रतिमेला नग्नछायाचित्र बनवणे हा छायाचित्रकारासाठी सोपा पर्याय असतो. असे केल्याने दृश्य आणि पाहणारा, दोघांचे सामान्यीकरण होते, व लैंगिकतेचे वैशिष्ट्य राहत नाही. त्यामुळे आसक्तीचे रूपांतर कल्पनारतीमध्ये होते.
विवस्त्रतेचे एक असामान्य तैलचित्र पाहुया. हे चित्र रुबेंसने आपल्या तरुण द्वितीय पत्नीचे काढले आहे. तिच्याशी लग्न झाले तेव्हा तो तिच्या तुलनेत वयस्कर होता.

आपल्याला ती वळताना दिसते. तिचा फर कोट खांद्यावरून सरकण्याच्या बेतात आहे. ती क्षणभरच अशा स्थितीत राहील हे उघड आहे. वरवर पाहता तिची प्रतिमा छायाचित्राएवढीच तात्कालिक आहे. परंतु खोलात जाऊन पाहता ह्या चित्रात काल व कालजन्य अनुभव, दोन्ही आहेत. आपण सहज कल्पना करू शकतो की एका क्षणापूर्वी, फर कोट खांद्यांवर ओढून घेण्याआधी, ती पूर्ण विवस्त्र होती. संपूर्ण दर्शनाच्या त्या क्षणाआधीचे व नंतरचे टप्पे तिने पार केले आहेत. ती एकाच वेळी त्यातील कोणत्याही एका किंवा सार्या क्षणांची असू शकते.
तिचे शरीर आपल्यासमोर येते ते तात्कालिक दृश्य म्हणून नव्हे तर एक अनुभव बनून--चित्रकाराचा अनुभव. कशावरून? तिचे विस्कटलेले केस, त्याच्याकडे पाहणार्या तिच्या डोळ्यांतील भाव, मृदुभावाने जरा जास्तच नाजूक चितारलेली तिची कांती ही झाली वरवरची, सांगण्याची कारणे. परंतु खरे, गहन कारण औपचारिक आहे. तिला चित्रकाराच्या आत्मनिष्ठतेने नवे स्वरूप दिले आहे. तिने अंगाभवती लपेटून घेतलेल्या फरखाली तिच्या शरिराच्या वरच्या भागाचा व तिच्या पायांचा मेळ बसत नाही. तिच्या मांड्या नितंबांपासून किमान नऊ इंच तरी डावीकडे आहेत.
रुबेंसने बहुधा हे ठरवून केले नसावे. पाहणार्याच्याही कदाचित ते लक्षात येणार नाही. ही गोष्ट तशी महत्त्वाची नाही. त्यामुळे काय घडू शकते ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे शरीराला एक अशक्यप्राय गतिमानता लाभते. त्याची सुसंगती त्याच्यापुरती न राहता चित्रकाराच्या अनुभवानुसार ठरते. आणखी नेमकेपणाने सांगायचे तर त्यामुळे शरीराचा वरचा व खालचा हिस्सा झाकलेल्या लैंगिक केंद्राभोवती पृथक, आणि विरुद्ध दिशांना वळू शकतात. धड उजवीकडे, पाय डावीकडे. त्याच वेळी हे झाकलेले लैंगिक केंद्र काळ्या फर कोटाच्या माध्यमातून चित्रातील सभोवतालच्या काळोखाशी जोडलेले आहे. काळोख तिच्या लैंगिकतेचे रूपक आहे व ती त्यात व त्याभवती फिरत आहे.
तात्कालिकतेच्या पलीकडे जाणे, व व्यक्तिनिष्ठता मान्य करणे ह्याव्यतिरिक्त कोणत्याही महान नग्नचित्रासाठी आणखी एक घटक आवश्यक असतो. तो आहे रटाळपणा. तो छुपा नसावा पण सर्द करणाराही नसावा. चोरून पाहणारा आंबटशौकीन व प्रेमी ह्यात हाच फरक आहे. आदर्श रूपबंधाचे सारे संकेत मोडणार्या व तरीही रुबेंसने न राहवून चितारलेल्या हेलीन फुर्माँच्या गबदूल जाडेपणात असा रटाळपणा सापडतो. (त्याला) तिच्या असामान्य वैशिष्ट्याची सतत ग्वाही देतो.
युरोपीय तैलचित्रांमधील नग्नचित्रे ही युरोपीय मानवतावादाची कौतुकास्पद अभिव्यक्ती म्हणून सादर केली जातात. हा मानवतावाद व्यक्तिवादाहून वेगळा नाही. ह्या व्यक्तिवादाची जाणीवपूर्वक वाढ झाली नसती तर परंपरेला अपवाद ठरणारी (विवस्त्रतेची अतिशय वैयक्तिक) चित्रे चितारली गेली नसती. पण ती परंपरा स्वत:तील एक विरोधाभास मिटवू शकली नाही. काही चित्रकारांनी ते अंत:प्रेरणेने ओळखले व आपल्या परीने त्या विरोधाभासावर तोडगा काढला. पण त्यांचे उपाय परंपरेच्या सांस्कृतिक चौकटीत शिरू शकले नाहीत.
हा विरोधाभास मांडणे सोपे आहे. एका बाजूला चित्रकाराचा व्यक्तिवाद, विचारवंत, आश्रयदाता, व मालक, तर दुसर्या बाजूला त्यांच्या कृतींचा विषय असलेली व एखाद्या वस्तू किंवा अमूर्त गोष्टीप्रमाणे वागणूक दिली जाणारी ती स्त्री.

ड्यूररच्या मते आदर्श नग्नचित्र बनवण्यासाठी एका शरिराचा चेहरा घ्यावा, दुसर्याचे स्तन, तिसर्याचे पाय, चवथ्याचे खांदे, पाचव्याचे हात इत्यादी.

असे केल्याने मानवाचे उदात्तीकरण होईल. पण त्यातून व्यक्तिविषयी मात्र विलक्षण उदासीनता दिसून येते.
नग्नचित्रांच्या युरोपीय कलाप्रकारात चित्रकार व प्रेक्षक-मालक बहुधा पुरुष असत व ज्यांना वस्तुंसारखे वागवले जात त्या स्त्रिया. हा विषम परस्परसंबंध आपल्या समाजात इतका खोलवर रुजला आहे की आजही अनेक स्त्रियांच्या जाणिवांना तोच आकार देतो. पुरुष त्यांना जसे वागवतात तशाच त्या स्वत:ला वागवतात. आपल्या स्त्रीत्वाचे त्या पुरुषांप्रमाणे निरीक्षण करतात.
आधुनिक कलेत नग्नचित्रांचे महत्त्व कमी झाले आहे. चित्रकार स्वत: त्याविषयी सवाल करू लागले आहेत. इतर अनेक गोष्टींप्रमाणे हा बदलही प्रथम मॅनेने घडवून आणला. टिटियनच्या मूळ चित्राशी त्याच्या ऑलिंपियाची तुलना केल्यास आपल्याला पारंपरिक भूमिकेतली स्त्री काहीशा उद्दामपणे त्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारू लागलेली दिसते.


आदर्श भंग पावले होते. परंतु त्याची जागा घेण्यासाठी वेश्येच्या 'वास्तववादा'शिवाय फार काही नव्हते. ही वेश्या मग विसाव्या शतकाच्या प्रारंभकालीन एँवाँ-गार्ड चित्रकलेची आदर्श स्त्री झाली. (टुलूझ-लॉट्रेक, पिकासो, रुआल्ट, जर्मन आविष्कारवाद, वगैरे.) पंडिती चित्रकलेत परंपरा तशीच पुढे चालू राहिली.
आज त्या परंपरेच्या चालीरीती व मूल्ये जाहिराती, बातम्या, दूरदर्शन अशा अधिक प्रसार असलेल्या इतर माध्यमांतून दिसून येतात.
पण स्त्रियांकडे बघण्याची मूलभूत तर्हा, त्यांच्या प्रतिमांचा मूलभूत वापर बदलले नाहीत. स्त्रियांचे चित्रण पुरुषांपेक्षा फार वेगळ्या पद्धतीने केले जाते. त्या पुरुषांहून वेगळ्या असतात म्हणून नाही, तर 'आदर्श' प्रेक्षक पुरुष असल्याचे गृहीत धरलेले असते म्हणून. स्त्रीची प्रतिमा त्याला खुश करण्यासाठी रचलेली असते. ह्याविषयी शंका असल्यास पुढील प्रयोग करून पहा. ह्या पुस्तकातील एक पारंपरिक नग्नचित्र घ्या. मनातल्या मनात किंवा त्या चित्राच्या प्रतिकृतीवर त्या स्त्रीचे पुरुषात रूपांतर करा. मग त्या रूपांतराने किती इजा पोहोचवली आहे ते पहा. प्रतिमेला नव्हे, एखाद्या संभाव्य प्रेक्षकाच्या गृहीतकांना.