पारंपारिक आई

माझे गाव कोकणातले. बालपण कोकणातल्या एका शहरात गेले. वडील आणि काकांचा एकत्र व्यवसाय. तर आई आणि काकी घराची आघाडी सांभाळायला घरी. थोडक्यात एकत्र कुटुंब. काका  वयाने मोठे असiल्याने कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत. काका जुन्या विचारांचे, त्यामुळे घरी कडक शिस्त. कोकणातल्या सर्वसामान्य कुटुंबात हेच चित्र दिसून यायचे. आता थोडीशी परिस्थिती बदलेली दिiसतेय. पण गेल्या दशका पर्यंत तरी सर्वत्र हीच परिस्थिती होती. आईचे माहेर जवळच्याच खेडेगावात. त्यामुळे तिथेही परिस्थिती थोडीफार तशीच. आईला हे काही नवीन नव्हत. आई तर लहानपणी परकर ब्लाउज  वापरत असे. आणि नंतर शाळेतच साडी नेसायला सुरुवात झाली. तेव्हाच्या एस एस सी ला शाळेत मुली साडी नेसून जायच्या. तेव्हा जी साडी नेसायला सवय झाली ती कायमची. आणि आमच्या काकांचा तर फतवा होता कि बायकांनी साडीच नेसायची. त्यामुळे आईला तर फरक पडला नव्हता. घरी बाहेर कुठेही गेली तरी साडीच. आणि ९० च्या दशकात तर बाकी कसले फ्याड आलेच नव्हते. आमचे तसे लहान शहरच होते. पण तरीही पुढारलेले नव्हते. गावात फक्त एखाद्या डॉक्टरची बायको कधीतरी पंजाबी ड्रेस घालून बाहेर पडत असे आणि तिला इतर बायका एखाद्या सिनेमाची हिरोईन पाहिल्यासारखे पाहत असत. ह्या बायकांना आपल्याला ड्रेस घालायला मिळत नाही ह्याचे दुख नसले तरी तिच्या ड्रेस घालण्याचे कौतुक वाटे. ती कावाटतेहीतरी धाडस करतेय अशी त्यांची भावना असायची असे आता मला वाटते . आमच्या घराण्यात तर साडी हा मान्यताप्राप्त पोशाख होता. कुटुंबात, चुलत वगैरे सर्व पकडून, एकही स्त्री साडीशिवाय काहीही वापरत नसत. आई किवा काकी ह्यांच्या मनाला तो विचारही शिवला नव्हता.

 एकदा माझी मुंबईची मामी मे महिन्याच्या सुट्टीत आपल्या मुलीसह गावी आलेली. साधारण हि ९६ सालची  गोष्ट असेल. मामी मुंबईत लहानाची मोठी झाल्यामुळे तिला गावाची सवय नव्हती. त्यात तिच्या जमवून न घेण्याच्या थोड्याश्या स्वभावाने तिचे तिच्या गावाच्या नातेवाईकांपेक्षा आईशी जास्त पटायचे. त्यामुळे आईच्या माहेरच्या एकत्र कुटुंबपेक्षा ती आमच्या एकत्र कुटुंबात राहणे पसंद करे. ती आलेली असताना एके दिवशी संध्याकाळी बीचवर जायचा प्रोग्राम ठरला. सवयीप्रमाणे तिने पंजाबी ड्रेस घातला. काकांना ते पसंद नसले तरी पाहुण्यांना कसे बोलायचे त्यामुळे ते काही बोलू शकत नव्हते.  सहसा बाहेर न पडणारी आई मात्र आपली पारंपारिक साडी नेसून  बाहेर पडली. ती सवय एवढी अंगवळणी पडलेली कि पुढच्या मे महिन्यात २-३ आठवडे मी आई आणि माझा मोठा भाऊ परीक्षा संपल्यावर मुंबईला मामीकडे गेलेलो. मामीने आम्हाला बऱ्याच ठिकाणी फिरविले. सगळीकडे फिरायला जाताना आई सध्या साडीत, तर मामी पंजाबी ड्रेस मध्ये. सुरुवतीला मामीने आईला पंजाबी ड्रेस घालण्याबद्दल विचारलेले. पण आईने ज्याप्रकारे तिला नकार दिला त्यावरून तिला आग्रह करावासा देखील वाटला नसेल. लग्न झालेल्या बायकांसाठी फक्त साडीच बनवलेली आहे असं त्याकाळात गावाच्या बायकांच्या मनावर बिम्बवलेलेच  होते. आईच्या मैत्रिणी देखील समविचारीच होत्या.
१९९९ साली मे महिन्यात मला बारावीच्या पूर्वतयारीसाठी पुण्याला क्लासला पाठवयाचे ठरले. जवळपास ७ आठवडे पुण्यात रहायचे होते. रहायची सोय आईच्या एका चुलत भाचीकडे केलेली. पण तिचे कुटुंब सुट्टीत गावी जायचे असल्याने शेवटी तोडगा म्हणून आएईने सोबत यायचे ठरले. एका आठवड्याने  ते सर्व गावी गेल्यावर मी आणि आईच तिथे राहू लागलो. आई रोज दुपारी मला क्लास पर्यंत सोडायला आणि संध्याकाळी न्यायला येत असे. शेजारच्या काकुंशी तिची ओळख झालेली. पण त्या देखील दिवसा ऑफिसला जात. पुण्यातला उन्हाळा कोकणपेक्षा फार वेगळा. त्यामुळे त्याचा जास्त त्रास दोघानाही वाटू लागलेला. साडीमुळे फार गरम होते आणि घरी जाईपर्यंत साडी घामाने भिजते हे आईने उन्हाळ्याची तीव्रता सांगणारे वाक्य मला २-३ वेळा ऐकवलेले. त्यावर तिने सोडायला येऊ नये असा उपाय मी तिला सुचवलेला. पण तो तिला अमान्य होता. 
असेच  आठवडा गेला आणि आमचा दोघांचा दिनक्रम आता व्यवस्थित सुरु झालेला. एके दिवशी दुपारी जेवण वाढून आई मला क्लासला सोडण्यासाठी तयारी करायला बेडरूम मध्ये गेली.  माझे जेवण उरकले तरी आज आईची तयारी होईना. शेवटी २-३ वेळा आईला उशीर होत असल्याची जाणीव करून दिल्यावर शेवटी आई एकदाची  बाहेर आली. आणि मला धक्काच बसला. आईने चक्क तिच्या भाचीचा म्हणजेच माझ्या मामेबाहीणीचा पंजाबी ड्रेस घातलेला. हे सर्व काही अनपेक्षित असल्यामुळे मला ते धक्का देणारे होते. आणि ती देखील थोडी अवघडल्यासारखी वाटत होती. कदाचित ड्रेस घालून बाहेर जावे कि जाऊ नये ह्या विचारात तिने आत बराच वेळ घालवला असावा.  ती काही वेगळे झालेच नाही असे दाखवायचा प्रयत्न करीत असली तरी तिला ते जमत नव्हते. तसेच आम्ही निघालो. ती ड्रेस मध्ये छान दिसत होती आणि पहिल्यांदाच घातल्यामुळे फार फरक जाणवत होता. आमच्या घराण्यची, आई ड्रेस घालणारी, पहिली सून होती. जाताना एकदा मी 'ड्रेस छान दिसतो'  असा अभिप्राय दिला तरी तिने विषय बदलला. 
नंतर रविवारी शेजारच्या जाऊन तिने कुठूनतरी २ ड्रेस विकत आणले. सलग ३ आठवडे ती रोज  ड्रेस घालून बाहेर पडत होती. शेवटच्या आठवड्यात मामेबहीण पुन्हा पुण्यात आली. त्यापूर्वी तिने ते ड्रेस ब्यागमध्ये ठेवले ते गावी गेल्यावरही बरेच दिवस ब्याग मध्येच होते. जरी पुण्यात केलेलं असले तरी तिच्यासाठी ते एक मोठे धाडसच होते.