मिणमिणता दिवा

मिणमिणता  दिवा..

 

मरगळलेल्या मनाला आशेची चाहूल लागली.

कंटाळलेल्या वर्तमानाला भविष्याची पालवी फुटली.

 

असाच कोणीतरी देवदूत पहाटे पहाटे समोर आला.

"तुला काही प्रश्न असतील तर उत्तरे मनात फुलवीन" म्हणाला.

जीवनाचे रहस्य काय ?संघर्षाचे बीज  काय ?

आनंदाचे आणि  वेदनेचे प्रयोजन काय ?

श्री कृष्ण ,मोहम्मद आणि येशूचे साध्य काय ?

त्यांना काय करायचे होते ? ते पूर्ण  झाले काय ?

 

मी हसलो... तो गोंधळला .

म्हणाला.."अरे वेड्या .. मी इथे  न बोलवता आलो आहे!

तुला उत्तरे द्यायला.. आणि तू असा हसतोस काय ? "

मी म्हणालो... अरे प्रश्न माणसांचे ... त्यांनीच उत्तरे शोधायला हवीत!

उत्तरे शोधायला देवदूताला यावे लागले,इथेच..

देवाच्या योजनेत नक्की काही तरी चुकले

 

प्रश्न माझ्या मनात असतील तर.. उत्तरेही असलीच पाहिजेत.

फक्त शोधण्याची गरज आहे .

देवदूताची इथे गरज कुठे आहे ?

आता हसण्याची पाळी देवदूताची होती... तो हसून म्हणाला ,

" अरे सगळा गुंता इथेच तर आहे! सगळा घोळ या मनाचा आहे.

मनाच्या बाहेर गेलास तर सारे काही स्वच्छ आहे!

हे जर तुला जमले तर तूच तुझा देवदूत! "

 

देवदूताने आपले काम केले..

मनाच्या कोपऱ्यात एक मिणमिणता दिवा लावून गेला..

मार्गावर माझ्या.. प्रकाश आपोआप पडत गेला ...

***********************************************************************************************

जयंत नाईक.