ह्याचसाठी

दूषित विचारांच्या किती झाल्यात गाठी
मी लावल्या जळवा मनाला ह्याचसाठी

"आहोत पाठीशी तुझ्या" ऐकीत आलो
सुनसान रस्ता खिजवतो बघताच पाठी

ठरल्याप्रमाणे आणले मी चंद्र तारे
भाळी तुझ्या पडली तरी आहेच आठी

व्यवहार,भाषा,वागणेही आंग्ल झाले
पण कागदोपत्रात मी आहे मराठी

जातात अन् येतात झेंडे वर निराळे
मी आपला ती खालची आधारकाठी

तो नियम साठीचा मला नव्हताच लागू
बुद्धी तशीही जन्मता होतीच नाठी

 

(जयन्ता५२)